श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला:४३
– श्रीअरविन्द:क्रांतिकारक ते महायोगी –
योगसाधना कशासाठी?
“ईश्वरीय शक्तीला आपली चेतना सन्मुख करणे, लौकिक व्यवहार करीत असतानाच अंतर्गत जाणीव अधिकाधिक विकसित करणे हे योगसाधनेचे एक उद्दिष्ट आहे. आपल्या अंतरात्म्याच्या प्रकाशात आपले जीवन शुद्ध आणि शुद्धतर करायचे आहे. ईश्वरीय शक्तीच्या अवतरणामुळे जे परिवर्तन घडून येणार आहे त्यासाठी स्वतःला सिद्ध करावयाचे आहे. यातून ईश्वरीय ज्ञान, ईश्वरीय प्रेम आणि ईश्वरीय इच्छा यांच्याशी एकरूप होऊन जाणे शक्य होईल.”
श्रीअरविंदांच्या योगाचे वैशिष्ट्य
श्रीअरविंद एके ठिकाणी म्हणतात, “मी प्रतिपादीत असलेला पूर्णयोग जुन्या योगपद्धतींच्या तुलनेने नवा आहे. (१) व्यक्तीने या जगातून पलीकडे स्वर्गात किंवा निर्वाणाप्रत जायचे असा या योगाचा उद्देश नाही. पार्थिव (पृथ्वीवरील) जीवनातच परिवर्तन घडवून आणावयाचे आहे. हे ध्येय दुय्यम अथवा जाताजाता साधण्याचे नसून हाच साधनेचा प्रधान उद्देश आहे. जुन्या योगपद्धतींमध्ये ईश्वराकडे उत्थान करणे हेच महत्त्वाचे आहे. पण पूर्णयोगाच्या दृष्टीने आरोहण (वर चढत जाणे) ही अवतरणापूर्वीची प्रथम पायरी आहे आणि आरोहणामुळे जाणिवेचे अवतरण घडून येणे हे पूर्णयोगाच्या साधनेचे फलित आहे. तंत्रमार्ग किंवा वैष्णवपंथ यात जन्ममरणाच्या फेऱ्यांपासून मोक्ष मिळविणे हे साध्य मानतात. परंतु पूर्णयोगात परमेश्वरी संकेताची, इच्छेची परिपूर्ती करणे हे साध्य मानले आहे.”
वैश्विक साक्षात्कार
(२) “ईश्वरतत्त्वाचा व्यक्तिगत साक्षात्कार हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नव्हे. पृथ्वीवरील जाणिवेला उन्नत, विकसित करणे हा उद्देशआहे. वैश्विक आणि पूर्णतः नसला तरी काही अतिवैश्विक शक्तींचाही यात सहभाग असणार आहे. पार्थिव जीवनात, अतिमानस शक्तीचे अवतरण होणे, ती अधिष्ठित आणि कार्यरत होणे नुसते कठीण नसून तसे आजपर्यंत अध्यात्मजीवनातही झालेले नाही. तथापि करायचे आहे.”
(३) “या मार्गात पूर्वापार चालत आलेल्या साधनांचा उपयोग आहे. परंतु मर्यादित आहे. पूर्णयोगात जशी साधना करणे अपेक्षित आहे तशी साधना जुन्या योगमार्गांमध्ये पूर्णत्वाने सांगितल्याचे वाचनात किंवा ऐकिवात नाही… पूर्णयोग म्हणजे मळलेल्या वाटा चोखाळणे नव्हे. ते एक साहस आहे.”
(क्रमशः)
Special Article Series ShreeArvind Part 43