इंडिया दर्पण विशेष लेख
टेनिस सम्राटाची चटका लावणारी निवृत्ती
अखेर तो निवृत्त झाला! गेली २४ वर्षे सातत्याने शरीराला आणि मनाला विश्रांती न देता तो खेळत राहिला, टेनिससाठी आपले सर्वस्व आणि सर्वोत्तम तो देत राहिला. शेवटी वयाच्या ४१ व्या वर्षी शरीर आता अगदीच साथ देत नाही असे लक्षात आल्याने त्याने मैदान सोडले तेही बहुधा अनिच्छेनेच! टेनिस सम्राट रॉजर फेडरर निवृत्त होण्याची घोषणा टेनिसप्रेमींसाठी मोठाच धक्का आहे.
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर सुरुवातीला बॉलबॉय होता आणि दिग्गजांचा खेळ पाहून टेनिसचा किडा त्याला चावला आणि त्याने टेनिसपटू होण्याचे ठरवले तेही साधासुधा खेळाडू नव्हे तर सर्वोत्तमच व्हायचे या इर्षेने तो झपाटल्यासारखा सराव करु लागला आणि त्याची अथक मेहनत, परिश्रम आणि गुणवत्ता यांनी त्याला २४ वर्षांच्या कारकिर्दीत २० ग्रँड स्लॅम पदके , १५०० सामने आणि थक्क करून टाकणारी गोष्ट म्हणजे त्यात ८२% विजय असे भरभरून माप दिले.
उत्तम फिटनेस आणि अष्टपैलू खेळ तसेच मैदानावर आदर्श वर्तन इ गुणांनी त्याला GOAT (Greatest of All Time) बनवले तेंव्हाच तो थांबला. विजयात त्याने उन्माद करून आनंद साजरा केला आणि पराजयात त्याने कुणाला बोल न लावता मोठ्या मनाने पराभव स्वीकारला . थोडक्यात या महान खेळाडूने खिलाडूवृत्ती कधीच सोडली नाही. त्याचे आदर्श वर्तन पाहून सुरुवातीला थोडे जास्त आक्रमक असलेले नादाल आणि जोकोविच देखील नंतर आदर्शवत वागू लागले.
जिंकण्यासाठी फक्त फिटनेस, जिद्द आणि गुणवत्ता पुरेशी आहे. अति आक्रमक वृत्ती एखादा विजय मिळवून देइलही पण अखेर मन शांत ठेवून एकाग्र वृत्तीने खेळले तर विजयाची आणि प्रेक्षकांची मने जिंकण्याची शक्यता अधिक असते हे फेडररने आपल्या खेळाने दाखवून दिले. सातत्याने यश मिळवण्यासाठी कुटुंबाची साथ आणि उत्तेजन अत्यंत आवश्यक असते हे ही त्याने दाखवून दिले. त्याची पत्नी मिरका आणि चार अपत्ये सतत त्याच्याबरोबर असत हे आपण पहातच आलो आहोत. त्यांच्या मानसिक आधाराचा त्याला सतत बूस्टर मिळत राहिला हे त्याने अभिमानाने नमूद केला आहे.
फेडररपेक्षा मोठे खेळाडू पूर्वी होऊन गेले (उदा. रॉड लेवर) पुढेही होतील पण आदर्श वर्तन, आदर्श खेळ आणि आदर्श प्रतिमा कुणाची असा प्रश्न विचारला तर एकच नाव पुढे येइल ते म्हणजे रॉजर फेडरर! त्याच्या संस्मरणीय कारकीर्दिला त्रिवार सलाम करताना त्याचा हसरा चेहरा, प्रतिस्पर्धी खेळाडूला जागीच खिळवून ठेवतील अशा सर्विस, अचूक ड्रॉप शॉटस आणि न घेता येणारे फॉरहँड आणि बँकहँडचे फटके या गोष्टी अवघ्या जगातील टेनिस शौकीन कधीही विसरणार नाही.
Special Article Roger Federer Retirement by Deepak Odhekar
Sports Tennis