स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला मोठी चालना!
– अमित कोठावदे मो. 9420608942
आज काल स्टार्टअप, इनोव्हेशन, युनिकॉर्न हे परवलीचे शब्द झाले आहेत. गेल्या दशकभरात या शब्दांनी विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. मलाही एक स्टार्टअप सुरू करायचंय, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तेव्हा स्टार्टअप म्हणजे नेमके काय, त्याचे वाढते आकर्षण का आहे, त्याला आज इतके महत्त्व का दिले जात आहे, चला तर याबद्दल थोडे जाणून घेऊयात..!
स्टार्टअप म्हणजे व्यवसायाचे नाविन्यपूर्ण (Innovative) स्वरूप. स्टार्टअप म्हणजे व्यवसायाचा असा प्रकार असतो, ज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्यातरी महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले जाते, त्यासाठी नाविन्यपूर्ण विचारसरणीची मदत घेतली जाते. आता ही नाविन्यपूर्ण विचारसरणी म्हणजे नेमके काय?
नाविन्यपूर्ण म्हणजे एखाद्या समस्येवर नवविचाराने, धोपट मार्ग न अवलंबता, (Out of Box thinking) उपाय शोधणे. नाविन्यपूर्ण उपाय – उत्पादने, प्रक्रिया, सेवा, तंत्रज्ञान किंवा कलाकृतीही असू शकतात. नाविन्यपूर्ण उपाय तंत्रज्ञानावरच आधारित असते असे नाही. दैनंदिन जीवनात आपण ज्याला जुगाड म्हणतो तेही एक नाविन्यपूर्ण संकल्पना/इनोव्हेशन असू शकते. म्हणून स्टार्टअप म्हणजे एखादे अॅप बनविणे किंवा इंटरनेटवर काही चालू करणे असे नसून यात तंत्रज्ञानविरहित व्यवसायही असू शकतात.
तंत्रज्ञानविरहित स्टार्टअप म्हणजे जसे की नारळाच्या झाडावर चढण्यासाठी पाईपने बनवलेले चपलेसारखे उपकरण ज्यामुळे झाडावर चढण्याचे कसरतीचे काम सोपे झाले आहे. तसेच तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप म्हणजे जसे की Ola, Uber यांनी दळणवळणाचा प्रश्न सोडविण्यासाठी बनविलेले अॅप, ज्यामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा, टॅक्सी व रिक्षाचालकांना सोप्या रितीने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नाविन्यपूर्ण उपाय प्राप्त झाला आहे.
बऱ्याचदा स्टार्टअप म्हणजे फक्त एखादा लहान उद्योग अशी गैरसमजूत होते. परंतु, कुठल्याही स्टार्टअपमध्ये भविष्यात मोठा उद्योग होण्याची क्षमता असते. नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचे हेसुद्धा समजणे आवश्यक आहे. एखाद्या गृहिणीने नव्याने सुरू केलेले पोळी-भाजी केंद्र हे तिच्यासाठी स्टार्टअपच असते, फरक इतकाच की त्या केंद्राला आपण स्टार्टअप म्हणत नाही.
राज्य शासनाच्या नियमानुसार असा उद्योग जो पुढील बाबींची पूर्तता करतो त्याला स्टार्टअप म्हटले जाते,
कंपनीचा प्रकार (खासगी मर्यादित, नोंदणीकृत भागीदारी किंवा मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी) व
वार्षिक उलाढाल (स्थापनेपासून कोणत्याही आर्थिक वर्षी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त नसावी) व
कंपनीचे वय (10 वर्षापेक्षा जास्त नसावे) व
नाविन्यपूर्ण (Innovative) विचारसरणी अशा उद्योगांस भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून स्टार्टअप म्हणून मान्यता प्राप्त होते.
स्टार्टअपविषयी एक गैरसमज प्रचलित आहे, तो म्हणजे फक्त तरुणांनी सुरू केलेल्या उद्योगांना व शहरातील सुरू झालेल्या उद्योगानांच स्टार्टअप म्हणायचे का? याचे उत्तर अर्थातच नाही असं आहे. कारण नाविन्यतेला भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. स्थानिक समस्या व त्याला सोडवण्याचा उपाय स्थानिक नागरिकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांतून मिळू शकतो. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी वयोमर्यादेची आवश्यकता अजिबात नसते. नाविन्यपूर्ण संकल्पना वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुचू शकते. मात्र हेही खरे की आज भारतातील एकूण स्टार्टअप उद्योजकांपैकी जास्तीत जास्त उद्योजक हे पस्तीशीच्या आतील आहेत.
स्टार्टअपना यशस्वी होण्यासाठी बऱ्याच घटकांची / बाबींची भूमिका महत्त्वाची ठरते. या परिसंस्थेतील विविध घटक/ बाबी म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शन, ग्रँट, इन्क्युबेशन, सीड फंडिंग, एंजल इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटल, क्राउड फंडिंग, अॅक्सेलेरेशन, युनिकॉर्न, इत्यादी
स्टार्टअपबाबत महत्वाची बाब म्हणजे आजकाल स्टार्टअपची क्रेझ असली तरी प्रत्येक स्टार्टअप यशस्वी होईलच असे नसते. स्टार्टअप म्हणजे नियमित व्यवसाय पद्धती नसून नवनवीन प्रयोग असतात. स्टार्टअप भविष्यात मोठा होईल याचा विश्वास असतो पण कोणतीही शाश्वती नसते. सर्व बाबी या प्रायोगिक तत्वावर सुरू होत असतात. नाविन्यपूर्ण कल्पना यशस्वी ठरली तर नवउद्योजक स्टार्टअपच्या मदतीने कोट्यवधी कमवितो अन्यथा, पुन्हा नवकल्पनेला न्याय देण्यास प्रयत्नशील असतो.
भारत हा जगातील सर्वाधिक तरूण देश आहे. लोकसंख्या लाभांश आपल्याकडे सर्वाधिक आहे. आजवर विविध आविष्कारांमुळे आपला देश जगात अग्रेसर ठरत आहे. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट असो किंवा पहिले शल्यचिकित्सक म्हणून ओळखले जाणारे महर्षी सुश्रुत असोत ! भारतीय आविष्कारांचा एक समृद्ध वारसा आहे. पारंपारिक व्यवसाय ते नाविन्यपूर्ण उद्योग उभारून जगभरात ठसा उमटवणारे अनेक उद्योगपती देखील या भूमीला लाभले आहेत.
येणार काळ हा स्टार्टअप व नाविन्यतेचा असणार आणि काळाची हीच गरज ओळखून तरूणांना संधी देत, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नाविन्यपूर्ण आविष्कारांची परंपरा अखंड राहावी यासाठी शासनाच्या पातळीवर सातत्यपूर्ण प्रयत्न चालू आहेत. स्टार्टअपना व नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन देऊन देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी शासनाद्वारे विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. केंद्र शासनाच्या स्तरावर स्टार्टअप इंडिया, नीती आयोग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अग्नी, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इ. विभागामार्फत विशेष योजना व उपक्रम राबवले जात आहेत.
महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे तसेच सर्वार्थाने देशास आवश्यक असणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची सातत्यपूर्ण चाचणी करीत देशाला दिशा देणारे अग्रणी राज्य आहे. औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी, नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८’ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (Maharashtra State Innovation Society) कार्यरत आहे. या धोरणातील मुख्य उद्दिष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, स्टार्टअपना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इ. चा समावेश आहे.
नाविन्यता सोसायटी मार्फत स्टार्टअप वीक, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण व प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर, हिरकणी महाराष्ट्राची यांसारख्या अनेक कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. अशा विविध उपक्रम व यशस्वीतेमुळे देशातील एकूण ८८ हजार १३६ मान्यताप्राप्त स्टार्टअप पैकी सर्वाधिक १६,२५० स्टार्टअप (१८%) महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. तसेच मुंबई मधे सुमारे ५ हजार ९०० पुण्यामध्ये 4 हजार 535, औरंगाबादमध्ये 3४२, सिंधुदुर्गमध्ये 19 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत.
अभिमानाची बाब म्हणजे देशातील १०८ युनिकॉर्न स्टार्टअपपैकी २५ युनिकॉर्नस् (23%) महाराष्ट्रातील आहेत
(युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन 1 बिलियन अमेरिकन डॉलर्स (100 करोड़ डॉलर ) म्हणजेच रुपये 8000 कोटी पेक्षा जास्त आहे)
स्टार्टअप म्हणजे काय? इथपासून जरी आपल्यातील बऱ्याच नागरिकांची सुरूवात असली तरी केवळ आपल्याला स्टार्टअप या संकल्पनेबद्दल काही माहिती नाही यास्तव आपल्या प्रतिभेला आणि सर्जनशीलतेला कोणीही डावलू शकत नाही. कारण, समकालीन काळामध्ये आपल्या संकल्पनेला सिद्ध करण्याची संधी ही मिळतेच! केवळ आपण आपल्या प्रतिभेला सातत्यपूर्ण दर्जात्मकतेच्या मार्गावरून मार्गक्रमित केले पाहिजे.
नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो. स्टार्टअप व नवउद्योजकांसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती, आवश्यक पाठबळ व सर्व बाबी आज रोजी उपलब्ध आहेत. युवकांचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र व राज्य शासन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अथक परिश्रमामुळे स्टार्टअपच्या क्षितिजावर महाराष्ट्राचे नाव अभिमानाने कोरले जाईल, असा विश्वास वाटतो. सळसळत्या उत्साहाने भरलेल्या उद्यमी युवाशक्तीच्या जोरावर स्टार्टअप नेशन ही ओळख मिळाल्यापासून जगात आपले मानांकन उंचावण्यासाठी आणि युवा वर्गातील उद्योजकतेला तळागाळापर्यंत नेण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहूया आणि भारताला जगाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून देऊया.
अमित कोठावदे
(सहाय्यक व्यवस्थापक),
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी. मो. 9420608942
Special Article on Startup and its Features