बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… असे आहे सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 13, 2023 | 9:38 pm
in इतर
0
Pitrupaksh 1

पितृपक्ष महात्म्य
पितरांना मोक्ष मिळवून देणारी सर्वपित्री दर्शनी अमावस्या!

पितृपक्षातील सर्वांत महत्वाचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. सर्वपितृ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित एक धार्मिक कृती आहे. सर्व पितृ म्हणजे सर्व पितरं आणि अमावस्या ज्याला आपण अवस देखील म्हणतो. त्याचा अर्थ आहे ‘नवा चन्द्र दिवस’. बंगालच्या काही भागात हा दिवस ‘महालय’ म्हणून साजरा केला जातो. जे दुर्गापूजेच्या सणाची सुरुवात करणे दर्शवतो. अशा प्रकारे या महत्वाचा दिवसाला महालय अमावस्या किंवा सर्वपितृ मोक्ष अमावस्या देखील म्हटले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार हे दक्षिण भारतात भाद्रपदाच्या महिन्यात साजरे करतात. हिंदू धर्मात या विधीचे खूप महत्व आहे. सर्वपितृ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध पक्षाची शेवटची तिथी असते. भाविक विविध श्राद्धाचे पालन करतात. भाद्रपद महिन्यात, हा काळ सोळा दिवसाचा असतो, जो पौर्णिमेला सुरु होऊन अमावस्येला संपतो.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

पद्धत आणि परंपरा
सर्व पितृमोक्ष अवसेच्या दिवशी मरण पावलेल्या त्या सर्व पितरांना तर्पण केले जाते ज्यांचा ‘पौर्णिमेला’, अवसेला, किंवा चतुर्दशी तिथीला मृत्यू झाला असेल. या दिवशी, लोकं सकाळी लवकर उठतात आणि सकाळचे सर्व नित्यकर्म आटपून पिवळे रंगाचे कापड घालतात. अन्नदान आणि देणगी देण्यासाठी आमंत्रित करतात. सामान्यतः: श्राद्ध समारंभ कुटुंबियातील ज्येष्ठ पुरुषानेच करावयाचा असतो. आमंत्रित व्यक्तीचे हात-पाय धुवून त्यांना आदराने बसवणं गरजेचं असतं. सर्व पितृ अवसेला लोकं पूजा करतात आणि फुलं, दिवा आणि धूपबत्ती लावून आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना विनवणी करतात. त्यांना आनंदी करण्यासाठी त्यांना जवेचं पाणी दिले जाते.

कुटुंबियातील मंडळी आपल्या उजव्या खांद्यावर एक पवित्र दोरा घालतात आणि देणगी देतात. पूजेची विधी पूर्ण झाल्यावर निमंत्रितांना जेवण देतात. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सतत मंत्रोच्चार केले जातात. कुटुंबीय आपल्या पितरांची माफी मागतात आणि त्यांनी आयुष्यात दिलेल्या त्यांचा योगदानासाठी कृतज्ञता व्यक्त करतात. त्याच बरोबर ते त्यांना सद्गती आणि शांती मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.

तर्पण सर्व पितरांना तृप्त करतात
ज्यांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, अशांचे श्राद्ध पितृपक्षात येणार्‍या आमावस्येला केले जाते. पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ पितराला पाहूणचार देण्याचा पितृ पंधरवाड्यातील हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी सकाळी तयार केल्या जाणार्‍या स्वयंपाकात आपल्या पूर्वजांना जे पदार्थ प्रिय होते ते आवर्जून केले जातात. विधीवत पूजा करून गाय, कुत्रा व कावळा यांचा नैवेद्य केळीच्या पानावर दिला जातो.

या दिवशी पितरांसाठीच्या पंचपक्वान्नांनी सजवलेल्या ताटाचा सुंगध घेऊन गायीला नैवेद्य दिला जातो. अमावस्येच्या संध्याकाळी पितृपक्षाच्या निमित्ताने आलेले पूर्वज आपापल्या वाटेला निघून जातात. त्याप्रमाणे पितर म्हणून आलेल्या व्यक्तीला जेवण, कपडे, रूमाल-टोपी व चपला देऊन अमावस्येच्या सायंकाळीच निरोप दिला पाहिजे. त्या दिवशी सायंकाळी ताजा स्वयंपाक करुन घराच्या दरवाज्याच्या पहिल्या पायरीवर अगरबत्ती प्रज्वलित करून पूर्वजांचे नाव घेतले पाहिजे. मुलांबाळांना सुखशांती लाभू दे, अशी प्रार्थना करायला पाहिजे.

महत्व आणि फायदे
सर्व पितृमोक्ष अमावस्येची तिथी आणि विधी खूप महत्वाचा मानला जातो. कारण ते समृद्धी, सौख्य कल्याण आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी साजरे करतात. श्राद्ध कर्म करणारे यमाचे दैवीय आशीर्वाद मिळवतात आणि कुटुंबियातील मंडळीना कोणत्याही प्रकारच्या वाईट होणं किंवा अडथळ्यांपासून वाचविण्याची विनवणी करतात. या आध्यात्मिक दिवशी, पितरं भेट देतात आणि जर श्रद्धे ने श्राद्ध विधी न केल्यास ते रागवून परत जातात.

ज्योतिष शास्त्रानुसार, असे मानले जाते की पितरांनी केलेल्या काही चुका किंवा केलेले पाप पितृदोष म्हणून त्यांचा संततीच्या कुंडलीत आढळतात. त्यामुळे त्यांचा मुलं-बाळांना त्यांचा आयुष्यात फार वाईट अनुभव घ्यावे लागतात. या विधींचे पालन करून या दोषांना दूर करून आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवू शकता.

सर्व पित्री अमावस्येला केलेल्या श्राद्ध विधीमुळे भगवान यमाचे आशीर्वाद मिळतात. भाविकांचे कुटुंब आपल्या जीवनातील सर्व प्रकारांचे पाप आणि अडथळ्यांपासून मुक्त होतात. हे पितरांच्या आत्म्याला सद्गती आणि मुक्ती देण्यास मदत होते. या श्राद्ध विधी केल्याने संततीला समृद्ध आणि दीर्घायुष्य असण्याचा आशीर्वाद मिळतो.

‘सर्वाधिक प्रिय तिथी’का?
या संदर्भात मस्त्यपुराणात एक कथा आहे. मस्त्यपुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोद नदीचा उल्लेख आहे. सरोवर आणि नदी काश्मीरमध्ये आहेत.
अच्छोदा नाम तेषां तु मानसी कन्यका नदी ॥
अच्छोदं नाम च सरः पितृभिर्निर्मितं पुरा ।
अच्छोदा तु तपश्‍चक्रे दिव्यं वर्षसहस्रकम् ॥
– मत्स्यपुराण, अध्याय १४, श्‍लोक २ आणि ३
अर्थ : भगवान मरिचीचे वंशज जेथे रहात असत, तेथेच अच्छोदा नामक नदी वहाते, जी पितृगणांची मानसकन्या आहे. प्राचीन काळी पितरांनी तेथे अच्छोद नावाचे एक सरोवर निर्माण केले होते. पूर्वी अच्छोदाने (अग्निष्वात्तची मानसपुत्री) एक सहस्र वर्षे घोर तपश्‍चर्या केली होती.

काश्मीर भारतातील प्राचीन राज्य आहे. मरिचिचा पुत्र कश्यप यांच्या नावाने पूर्वी काश्मीरचे नाव ‘कश्यपमर’ किंवा ‘कशेमर्र’ होते. मत्स्यपुराणामध्ये म्हटले आहे की, सोमपथ नावाच्या ठिकाणी मरिचिचा पुत्र अग्निष्वात्त नावाच्या देवतेचे पितृगण निवास करत होते. कालांतराने तेथेच अग्निष्वात्तची मानसपुत्री अच्छोदा हिने एक सहस्र वर्षे घोर तपस्या केली. तिच्या तपस्येने प्रसन्न होऊन देवतासम सुंदर आणि कांतीवान पितृगण वरदान देण्यासाठी अच्छोदाजवळ आले. सर्व पितर मनाला मोहून टाकणारे होते. त्यांचे सौंदर्य आणि रूपबळ यांनी प्रभावित होऊन अच्छोदा ‘अमावसु’ नावाच्या एका पितरावर आसक्त झाली. पितृगणाविषयी अशा प्रकारची इच्छा मनात बाळगणे, हा मोठा अपराध होता. तेव्हा अमावसु याने तत्काळ अच्छोदाच्या याचनेचा अस्वीकार करत तिला शाप दिला. ज्या पुण्यतिथीला अमावसु याने अच्छोदाच्या वासनेचा अस्वीकार केला होता, त्याच्या मर्यादाप्रियतेमुळे ती तिथी त्याच्या नावानेच ‘अमावास्या’ या नावाने प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासून आमच्या पितरांची ती सर्वाधिक आवडती तिथी आहे.

पवित्र दर्भाचे महत्त्व
महाभारतातील कथेनुसार गरुडदेव स्वर्गातून अमृत कलश घेऊन आले असता त्यांनी काही वेळासाठी तो कलश दर्भावर ठेवला होता. दर्भावर अमृत कलश ठेवल्याने दर्भाला पवित्र समजले जाते. श्राद्धाच्या वेळी दर्भापासून बनवलेली अंगठी अनामिकेत धारण करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की, दर्भाच्या अग्रभागी ब्रह्मा, मध्यभागी विष्णु आणि मूळभागी भगवान शिव निवास करतात. श्राद्धकर्मात दर्भाची अंगठी धारण केल्याने ‘आम्ही पवित्र होऊन आमच्या पितरांच्या शांतीसाठी श्राद्धकर्म आणि पिंडदान केले’, असा त्याचा अर्थ आहे.

अन्नदान श्रेष्ठ
एका प्रचलित कथेनुसार कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा स्वर्गामध्ये पोचला, तेव्हा त्याला भोजन करण्यासाठी पुष्कळ प्रमाणात सोने आणि आभूषणे देण्यात आली. हे पाहून कर्णाच्या आत्म्याला प्रश्‍न पडला. तेव्हा त्याने इंद्रदेवाला विचारले की, त्याला भोजनाच्या ऐवजी सोने का देण्यात आले ? तेव्हा इंद्राने कर्णाला सांगितले की, ‘तुम्ही जिवंत असतांना संपूर्ण जीवन सुवर्णदानच केले; परंतु कधीच तुमच्या पितरांना अन्नदान केले नाही.’ तेव्हा कर्णाने सांगितले की, ‘मला माझ्या पूर्वजांविषयी माहिती नव्हती. त्यामुळे मी त्यांना काही दान करू शकलो नाही.’

कर्णाला त्याची चूक सुधारण्याची संधी देण्यात आली आणि त्याला पितृपक्षाचे १६ दिवस पृथ्वीवर परत पाठवण्यात आले. तेथे त्याने त्याच्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध केले आणि अन्नदान केले. तसेच त्यांच्यासाठी तर्पण केले. या कथेतून आपण समजू शकतो की, सुवर्णदानापेक्षा आपल्या पितरांसाठी पिंडदान, अन्नदान आणि तर्पण करण्याचे महत्त्व अधिक आहे!

श्राद्धकर्म कोणाकडून करवून घ्यावे?
श्राद्धकर्म करणार्‍या व्यक्तींसंदर्भात शास्त्रग्रंथात काही नियम सांगितले आहेत, उदा. ही व्यक्ती वेदज्ञानी असायला हवी. ते पतितपावन असावेत. ते शांतचित्त, नियम-धर्माने वागणारे, तप करणारे, धर्मशास्त्रावर श्रद्धा असणारे, पित्याचा आदर करणारे, आचारवान आणि अग्निहोत्री असावेत. जर अशा योग्यतेची व्यक्ती मिळाली नाहीत, तर तत्त्वज्ञानी योग्याला बोलवून श्राद्ध कर्म करावे. असे योगीही मिळाले नाहीत, तर एखाद्या वानप्रस्थीला अन्नदान करून श्राद्ध कर्म करावे. वानप्रस्थीही मिळाले नाहीत, तर मोक्षाची इच्छा ठेवणार्‍या, अर्थात् साधकवृत्ती असणार्‍या गृहस्थाला अन्नदान करावे.

जो व्यक्ती ध्यान-पूजा, यज्ञ आदी नियमित कर्म करत नाही, त्याला बोलावून श्राद्धकर्म केल्याने पितरांना आसुरी योनी प्राप्त होते. एवढेच नाही, तर मद्यपी, वेश्यागमन करणारा, असत्य बोलणारा, माता-पिता, गुरु यांचा आदर न करणारा, चरित्रहीन, वेदांची निंदा करणारा, ईश्‍वरावर विश्‍वास न ठेवणारा, तसेच उपकार न मानणारा अशा व्यक्तीस श्राद्धकर्म करण्यास बोलावू नये, तसेच त्यांना दक्षिणाही देऊ नये. जे दान सदाचारी व्यक्तीला दिले जाते, त्यालाच ‘दान’ म्हटले जाते. दान देतांना कुटुंबाची उपेक्षा करून दान देऊ नये.

पितृपक्षात पितरांना श्रद्धा पूर्वक तर्पण किंवा अन्न अर्पण केल्यास पितरं संतुष्ट होतात असा वैश्विक अनुभव आहे. हिंदु असो वा अन्य कोणत्याही पंथाची व्यक्ती असो, जी धर्मशास्त्रांचे पालन करील, तिला त्याचा निश्‍चित लाभ होईल. ज्याप्रमाणे एखादे औषध घेणार्‍या व्यक्तीला, मग ती कोणताही पंथ, जात, धर्म यांची असो, तिला त्याचा लाभ होतो, त्याप्रमाणे हिंदु धर्मशास्त्रानुसार कृती केल्याने सर्वांनाच लाभ होतो.
(समाप्त)
(संदर्भ – धार्मिक ग्रंथ व विकिपीडिया)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

आरोग्य टीप्स… दररोजच्या या सवयींमुळे होतात हाडे कमजोर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
human body pain

आरोग्य टीप्स... दररोजच्या या सवयींमुळे होतात हाडे कमजोर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011