इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा ही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याने सध्या चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून नयनतारा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हे जरी असले तरी सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नयनताराने पती विघ्नेश शिवनसह उत्तर चेन्नईमध्ये अगस्त्य चित्रपटगृहाची ५३ वर्षे जुनी इमारत ‘राउडी पिक्चर्स’अंतर्गत विकत घेतली आहे.
नयनताराचा पती विघ्नेश हा देखील नावाजलेला दिग्दर्शक आहे. तर नयनतारा ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने ‘नेट्रिकॉन’, ‘गॉडफादर’, ‘इरू मुगन’, ‘गोल्ड’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती यशस्वी व्यावसायिक देखील आहे. अभिनयाव्यतिरिक्त नयनताराने स्किनकेअर कंपनी सुरू केली असून यामध्ये जवळपास १०० प्रकारचे लिप बाम बनवले जातात, असा दावा तिने काही मुलाखतींमध्ये केला होता.
अनेक सुपरस्टार्सचे चित्रपट प्रदर्शित झालेले थिएटर
अगस्त्य चित्रपटगृहामध्ये एमजीआर, शिवाजी गणेशन, रजनीकांत, कमल हसन, अजित कुमार अशा अनेक सुपरस्टार्सचे चित्रपट प्रदर्शित झाले. अगस्त्य थिएटर हे देवी थिएटर ग्रुपचे होते. चेन्नईच्या उत्तरेकडे ते १९६७ पासून सुरू होते. हे चित्रपटगृह जवळपास ५३ वर्षे सुरू होते. कोरोनादरम्यान सर्वत्र करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे थिएटर बंद करण्यात आले होते. बंद असल्याने येथील स्क्रीनची दुरवस्था झाली. आता नयनतारा आणि तिच्या पतीने या चित्रपटगृहाचे नूतनीकरण करण्याचा आणि त्याचे दोन-स्क्रीन सुविधेत रूपांतर करण्याचे ठरवले आहे.
South Actress Nayantara Buy Theatre in Chennai