पाटणा (बिहार) – चार पत्नी असताना पाचव्यादां विवाहाची तयारी करणाऱ्या मुलाला रोखणाऱ्या वडीलांचा मुलानेच कुऱ्हाडीने खून केला. बिहारमधील जमुई जिल्ह्यातील कोल्हुआ तालुक्याअंतर्गत सिमरिया गावात ही घटना घडली. माधो मांझी (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
गिधौर पोलिस ठाण्यांतर्गत खैरा पोलिस स्टेशन परिसरातील सिमरिया टोला येथील करुह मांझी (वय ४२) आणि त्याचे वडील माधो मांझी यांच्यामध्ये बुधवारी रात्री वाद झाले. यानंतर संतापलेल्या करु मांझीने रात्री उशिरा त्याच्या वडिलावर मागून कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी खैरा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच खैरा पोलिस ठाण्यातून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सदर रुग्णालयात पाठविला. या घटनेनंतर आरोपी मुलगा फरार आहे.
पोलीस म्हणाले की, ही घटना लग्नाच्या वादात घडली आहे. फरार मुलाचे चार विवाह झाले असून त्याच्या चारही बायकांना मुले आहेत. आता पुन्हा आरोपी मुलगा लग्नासाठी कुटुंबावर दबाव आणत होता. ही घटना वादातून घडली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी परिसरात चौकशी सुरू आहे.