नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- यशस्वी हृदयविकार उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी अनुभव आणि अत्याधुनिकता गरजेची आहे. यापार्श्वभूमीवर हृदयउपचार प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या नवनवीन बाबी तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे याउद्देशाने नाशिकमध्ये प्रथमच एसएमबीटी हॉस्पिटलच्या पुढाकाराने ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (TAVI) या अद्ययावत उपचारप्रक्रियेवर कार्यशाळा होत आहे. या कार्यशाळेसाठी आंतराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी हृदयविकारावर मोठे काम केले आहे, लाखो रुग्णांना ज्यांनी आजवर जीवदान दिले आहे असे प्रख्यात हृदयविकार तज्ञ व प्रोफेसर जान कोवाक हे एसएमबीटी हॉस्पिटलला भेट देणार आहेत. याबाबतची माहिती हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक तथा प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ गौरव वर्मा यांनी दिली.
ते म्हणाले, उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अद्यायवत हृदयविकार उपचार व शस्रक्रिया विभाग म्हणून एसएमबीटी हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटकडे बघितले जाते. गेल्या ९ वर्षांत आतापर्यंत २८ हजारांपेक्षा अधिक हृदयविकार उपचार व शस्रक्रिया याठिकाणी करण्यात आल्या आहेत. यामध्ये १५ हजारांपेक्षा अधिक अन्जिओग्राफी, ८ हजारांपेक्षा अधिक अन्जिओप्लास्टी, तीन हजारांहून अधिक बायपास शस्रक्रिया आणि जन्मजात हृदयविकार असलेल्या दोन हजारांपेक्षा अधिक बालकांवर डिव्हाईस क्लोजर शस्रक्रिया याठिकाणी करण्यात आल्या आहेत.
हृदयविकार शस्रक्रिया विभागाचे विभागप्रमुख डॉ विद्युतकुमार सिन्हा प्रख्यात हृदयविकार शस्रक्रिया तज्ञ असून हजारो रुग्णांना त्यांनी जीवदान दिले आहे. अत्याधुनिक प्रकारच्या वैद्यकीय सेवा देणारे एसएमबीटी हॉस्पिटलने हृदय शस्त्रक्रिया आणि उपकारांचा नवा उच्चांक गाठला आहे. दर्जेदार हृदयउपचार हा प्रत्येकाचा अधिकार आहे. येत्या सोमवारी (दि १७) रोजी जगप्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट प्रा. जान कोवाक यांच्या मार्गदर्शनाखाली एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (TAVI) ही अत्याधुनिक प्रक्रिया केली जाणार आहे.
धाप लागणे, अशक्तपणा, अंधारी येणे, छातीत अस्वस्थ वाटणे आणि झोपेतून सतत जाग येणे तसेच महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट न उघडणे, रक्तप्रवाहामध्ये आलेल्या अडथळ्यामुळे हृदय कमकुवत होणे, तसेच डावे निलय निकामी होणे अशा अतिशय बिकट अवस्थेत असलेल्या रुग्णांवर वॉल्व्ह रिप्लेसमेंट किंवा बायपास शस्रक्रिया करणे शक्य नाही अशा रुग्णांवर तावी शस्रक्रिया नवा पर्याय आहे. प्रा. कोवाक दोन रुग्णांवर तावी (TAVI) प्रणालीने उपचार करणार असल्याचे डॉ. वर्मा म्हणाले. एसएमबीटी तावी प्रणालीने अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेल्या अद्यायवत उपचारांची माहिती येथील तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांना व्हावी यादृष्टीने ग्रामीण भागातील डॉक्टरांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी विविध कार्याशाळा घेतल्या जातात. एसएमबीटी हे किचकट आणि कठीण स्वरुपाच्या यशस्वी हृदयउपचारासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. याठिकाणी हृदयविकारावरील अनेक उपचार योजनेंतर्गत मोफत आणि नाममात्र दरात योजनेत न बसणारे उपचार होतात. कोणत्याही परिस्थितीत हृदयरुग्णाला दर्जेदार उपचार मिळाले पाहिजे यासाठी आमची संपूर्ण टीम कार्यरत आहे. तसेच अन्जिओग्राफी, अन्जिओप्लास्टी, डिव्हाईस क्लोजर, कॉम्प्लेक्स अन्जिओप्लास्टी आणि इतर किचकट समजल्या जाणारे सर्वच उपचार याठिकाणी होत असल्याचे डॉ वर्मा म्हणाले.
तावी शस्रक्रिया म्हणजे काय?
ओपन हार्ट सर्जरीला तावी शस्रक्रिया पर्याय आहे. ही अत्याधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया आहे. रुग्णाच्या मांडीतून एक सुई टाकून कॅथेटरच्या साहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते. या उपचारामुळे रुग्णांना कमी वेदना होतात, रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळतो विशेष म्हणजे रक्तस्राव कमी होतो व शस्रक्रीयेचे व्रणदेखील कमी पडतात.
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये सवलतीत तावी शस्रक्रिया
हॉस्पिटलमध्ये असलेल्या अद्यायवत साधनसामुग्रीमुळे याठिकाणी अतिशय क्लिष्ट शस्रक्रिया पार पडतात. याचाच एक भाग म्हणून गेल्या काही महिन्यांपासून तावी ही अत्याधुनिक शस्रक्रिया एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नियमित केली जात आहे. आजवर अनेक रुग्णांवर यशश्वी उपचार झाले आहेत. विशेष म्हणजे, इतर ठिकाणी येणाऱ्या खर्चापेक्षा याठिकाणी ५० टक्के कमी दरांत ही शस्रक्रिया होत आहे. अतिशय बिकट अवस्थेत असलेले रुग्ण, वॉल्व्ह रिप्लेसमेंट किंवा बायपास शस्रक्रिया शक्य नसलेल्या रुग्णांवर तावी शस्रक्रिया नवा पर्याय आहे. या कार्यशाळेदरम्यान देखील काही रुग्णांवर ही शस्रक्रिया सवलतीत होणार आहे.