सिन्नर – नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास कार व आयशरच्या अपघात तीन जण जागीच ठार झाले. हॉटेल अन्विता समोर हा अपघात झाला. या अपघातात कारमधील शरद गोविंदराव महाजन (३९ रा. म्हसरुळ, नाशिक), भूषण बाळकृष्ण बधान (३६, रा. पाथर्डी फाटा, नाशिक), राजेश तिवारी (३४, रा. कल्याण, ठाणे) हे तिघे जागीच ठार झाले. तिघेही मॅनकाईन्ड या औषध कंपनीचे प्रतिनिधी होते. पुणे येथे बैठकीसाठी ते गेले होते. पुणे येथून परत येत असताना हा अपघात झाला.
या अपघातात बाबत अधिक माहिती अशी की, पुणेहून नाशिककडे जाणारी स्विफ्ट कारने (एम. एच. १५/ सी. टी. १७२१) हॉटेल अन्विता समोर उभा असलेल्या आयशरला (टी. एस. ३०/टी. ८८८६ ) पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची समस्याही निर्माण झाली होती. यानंतर स्थानिकांच्या मदतीने तत्काळ रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. तीन्ही मृतदेह दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवगृहात आणल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, एकाच कंपनीतील दोन मॅनेजर आणि एक मार्केटिंग प्रतिनिधी ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.