नायगाव गटात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कामांचे भूमिपूजन
….
सिन्नर– सिन्नर तालुक्यात सध्या दुसऱ्यांच्या कामांची श्रेय लाटण्याचे काम जोरात सुरू आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी अनेक विकास कामे केली या कामांचे भूमिपूजने अजूनही होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले. नायगाव गटातील केपा नगर- कोमलवाडी- घंगाळवाडी, निमगाव सिन्नर ते सिन्नर हद्द, तळ्यातील भैरवनाथ आणि चिंचोली ते साखर कारखाना या मार्गांचे भूमिपूजन करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार राजाभाऊ वाजे युवानेते उदय सांगळे जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, संजय सानप, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, खरेदी-विक्री संघाचे कचरू गंधास, नगरसेवक गोविंदराव लोखंडे, दत्ता डोमाडे, विजय कटके विलास सांगळे भाऊसाहेब हरळे अरुण बिन्नर गणेश आव्हाड, सुभाष लांडगे मारुति काकड किरण घुगे दत्तात्रय सानप, नवनाथ बर्डे निवृत्ती झाडे राजाराम नवाळे, शिवाजी शेळके आदी उपस्थित होते.
करंजकर म्हणाले की माजी आमदार वाजे व माजी अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे आणली. त्यांच्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. वाजे यांनी अनेक विकास कामे आणली मात्र त्याचा गवगवा केला नाही. जलयुक्त शिवार, पाणी पुरवठा योजना, रस्ते अशा विविध लोकाभिमुख विकास योजना त्यांनी आणल्या व पूर्ण केल्या अजूनही काही कामांची भूमिपूज होत आहे व होणार असल्याचे करंजकर यांनी सांगितले.
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आपण केलेल्या कामांचे मार्केटिंग केले नसल्याचे सांगितले. ज्याच्या कामाचे श्रेय त्यानेच घ्यायला हवे. खोटे सांगून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा खोचक टोला ही वाजे यांनी मारला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या समिती सदस्यपदी असताना तालुक्यात या कामांसह आणखी कामे मंजूर केली अाहेत.
ते आले तर जाब विचारा
माजी आमदार वाजे यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेणारे भूमिपूजनाला आल्यास त्यांना जाब विचारा. त्यांच्याकडे पुरावे मागा. आम्ही आमचे पुरावे फलकावर लावले असल्याचे युवा नेते उदय सांगळे यांनी मनोगतात सांगितले आणि कामांचे भूमिपूजन भविष्यात सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.