सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या अनेक वर्षापासून अवसायनात गेलेल्या व अनेक वर्षापासून आपल्या कष्टाने जमविलेली पुंजी मिळविण्यासाठी सिन्नर नागरी पतसंस्थेकडेव निबंधक कार्यालयात चकरा मारुन हवालदील झालेल्या गुंतवणुकदारांमध्ये आपल्या कष्टाचे पैसे लवकरच परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.. नुकतीच सिन्नर नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांची व सहा. निबंधक संजय गीते यांचे समवेत बैठक संपन्न झाली. थकबाकीदारांचे पैसे वसुल करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करुन, कायदेशीर बाबी व पोलीस यंत्रणांच्या सहाय्याने थकबाकीदारांच्या तारण व इतर मालमत्तांचा लवकरच लिलाव करण्यांत येईल. या कामासाठी अंतीम प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर आम्ही करीत आहोत असे ठाम आश्वासन श्री गीते यांनी ठेवीदारांना दिले.
वसुली वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यांत येत असून लिलावाचे वेळी ठेवीदारांनी लिलावात भाग घ्यावा असेही आवाहन वसुली अधिकारी श्री शेंडे यांनी केले. त्याचप्रमाणे संस्थेच्या मालकीच्या मालमत्ता यांचाही लिलाव करावा अशी मागणी उपस्थित ठेवीदारांनी यावेळी केली. परंतु संस्थेच्या मालमत्ता न्यायालयीन प्रक्रीयेत असल्यामुळे न्यायालयाच्या परवानगीशिवाय मालमत्तांचा लिलाव करता येणार नाही असे यावेळी अधिकार्यांनी सांगितले. यावेळी संतप्त ठेवीदारांनी आमची रास्त मागणी लेखी स्वरुपात मा. न्यायालयाला, व संबंधित अधिकार्यांना पाठवा अशी मागणी केली. जे ठेवीदार मृत झालेले आहेत त्यांच्या वारसांनी आपले वारस नोंद करुन घेण्याचे आवाहन यावेळी सर्वांनी केले.
थकबाकीदारांच्या मालमत्तांची लिलाव प्रक्रीया सुरु झाल्यानंतर त्याची वृत्तपत्रीयव इतर माध्यमातून करण्यांत येणारी जाहिरात पतसंस्थेच्या सर्व सभासदांना व संबंधित अधिकार्यांना सहा. निबंधक व जिल्हा निबंधक कार्यालयाकडून करण्यांत येईल असे आश्वासन सहा. निबंधक श्री संजय गीते , वसुली अधिकारी श्री शेंडे यांनी उपस्थित ठेवीदारांना दिले.
याबाबत दि. १९ जुन २५ पर्यत झालेल्या ,केलेल्या व उर्वरित कार्यवाहीचा अहवाल व अंतीम निर्णय घेण्यासाठी दि. २० जुन २५ रोजी पुन्हा ठेवीदार व संबंधित अधिकार्यांसमवेत बैठक घेण्यात येईल असे श्री गीते यांनी सांगितले. तत्पुर्वी सहा. निबंधक यांचेसह सर्व ठेवीदार, संबंधित अधिकारी यांनी ठेवीदारांचे गार्हाणे मांडण्यासाठी सोमवार दि. २८ एप्रिल २५ रोजी सकाळी ११ वा. जिल्हा निबंधक कार्यालय नाशिक येथे हजर राहण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीस सहा. निबंधक संजय गीते, वसुली अधिकारी शेंडे, सर्वश्री शेळके, भुसे, डाॅ. जी.एल. पवार, नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सेवा निवृत्त अधिकारी श्री राजेंद्र घोगे, भाउसाहेब सांगळे,दिवाकर पवार, कृष्णा पवार आदींनी चर्चेत भाग घेउन मार्गदर्शन केरुन आपले विचार मांडले.
..यावेळी सभासद सर्वश्री दशरथ लोंढे, तानाजी जाधव, सोमनाथ तांबे, सुरेश आव्हाड, श्रीकांत गुजराथी, श्रीमती संध्या बिडवे, सौ. मालन इंदूरकर, रोशन पवार, निवृत्ती डावरे, बाळासाहेब घोलप, सुबोध वाईकर, विनोद वाईकर, दत्तात्रय डोंगरे, श्रीम. शांता लोंढे आदी उपस्थित होते.