इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी राज्यसभा सदस्य डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन झाले. डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वातच इस्रोने स्वावलंबी होण्याचा मार्ग स्वीकारला, तसेच चंद्रयानसारख्या मोठ्या मोहिमांचे नियोजन करण्यास सुरुवात झाली. त्यांनी इस्रोबरोबरच नियोजन आयोगाचे सदस्य, उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरण अशा विविध विषयांवर सरकारला सल्ला देणाऱ्या समित्यांचे अध्यक्षपद, सदस्यपद सांभाळले. त्यांच्या निधनाने भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक वाटचालीतील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले, भारताच्या अवकाश कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेले असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करताना आणि भारतातील शिक्षण अधिक समग्र तसेच भविष्याला अनुसरून असावे याची सुनिश्चिती करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरता भारत नेहमीच डॉ. कस्तुरीरंगन यांचा ऋणी राहील. ते अनेक तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शक देखील होते, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश : भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक वाटचालीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या, डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने मी खूप व्यथित झालो आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि राष्ट्रासाठी दिलेले निःस्वार्थ योगदान कायमच स्मरणात राहील.
त्यांनी इस्रोमध्ये अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले, भारताच्या अवकाश कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेले, ज्याची अवघ्या जगानेही दखल घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाकांक्षी उपग्रह प्रक्षेपण झाले आणि नवोन्मेषावर भर दिला गेला.
छगन भुजबळ यांनी अर्पण केली श्रध्दांजली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी राज्यसभा सदस्य डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वातच इस्रोने स्वावलंबी होण्याचा मार्ग स्वीकारला, तसेच चंद्रयानसारख्या मोठ्या मोहिमांचे नियोजन करण्यास सुरुवात झाली. त्यांनी इस्रोबरोबरच नियोजन आयोगाचे सदस्य, उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरण अशा विविध विषयांवर सरकारला सल्ला देणाऱ्या समित्यांचे अध्यक्षपद, सदस्यपद सांभाळले. त्यांच्या निधनाने भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!