सिन्नर – तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील वारा डोंगर व गोपाल दरा भागात शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास डोंगराला अचानक भीषण आग लागली.सिन्नर नगरपालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या याठिकाणी दाखल झाल्या होत्या. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आगीने दोन ते तीन किलोमीटर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रौद्र रूप धारण केल्यामुळे नांदूर व चास खिंडीत असलेली वनसंपत्ती जळून खाक झाली. जंगली प्राण्यांची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. सर्वत्र आगीने रौद्ररूप रूप धारण केलेले असल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. सिन्नर येथून वनविभागाला व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र बहुतांशी ठिकाणी आग असल्यामुळे व अग्निशमन दलाच्या बंब यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण बनले होते. याठिकाणी शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र वारा असल्यामुळे ही आग आटोक्यात येणे मुश्किल झाले.