नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील वडांगळी,ठाणगाव व मालेगाव येथे वास्तव्यास राहणारा भावसारांचा गुरुकृपा परिवार अंधांना दृष्टी देण्याचे काम करत आहे. या परिवाराच्या संकल्पनेतून वडांगळी येथील या परिवाराचे आधारस्तंभ संजय प्रभाकर भावसार यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे नेत्रदान सोमवारी (२४ जानेवारी) करण्यात आले. परिवाराच्या दृष्टीने झालेले हे २१ वे नेत्रदान ठरले.
संजय भावसार यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी सोमवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने दुखद निधन झाले. नाशिक येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले त्यांचे चुलत बंधू नंदकिशोर भावसार यांना ही माहिती समजताच त्यांनी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतांनाही कुटुंबाला दुःखातून सावरत ‘मरावे परी किर्तीरूपे उरावे’ या उक्तीनुसार बंधू संजय भावसार यांचा देह जगाच्या उपयोगी पडला पाहिजे, यासाठी नेत्रदान करण्याची संकल्पना कुटुंबापुढे मांडली. संजय भावसार यांनीही तसा संकल्प केलेलाच होता.कुटुंबाने आपले दुःख बाजूला करत यावेळी मयत संजय भावसार यांच्या नेत्रांचे दान केले.ज्यामुळे अनेक व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे.
या गुरुकृपा परिवारात सामाजिक चळवळ उभी करणारे नंदकिशोर भावसार सांगतात की,साधारण ५०० हून अधिक जणांचा गुरुकृपा परिवार असून यातील अनेकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे.आता पर्यंत २१ जणांनी मृत्यूपश्चात नेत्रदान केले असून अनेकांनी नेत्रदानाचा संकल्पही केला आहे.तेराव्याला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते.प्रत्येक शिबिरात ४० ते ५० जण रक्तदान करतात.परिवारातील सर्वांचेच नेत्रदान व रक्तदान करण्यासाठी उद्बोधन करण्यात येत असुन हळूहळू सर्वांचीच मानसिकता तयार होत असल्याचे नंदकिशोर भावसार सांगतात.