मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची’ या रिएलिटी शोचा अंतिम सोहळा २५ सप्टेंबर रोजी पार पडला. यंदाच्या पाचव्या आणि लक्षवेधी शोमध्ये अंतिम विजेता कोण होणार, याची सर्वांमध्येच उत्सुकता होती. उत्कर्ष वानखेडे याने राजगायक होण्याचा मान पटकावला. त्याला भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी – आनंदजी या जोडीमधील आनंदजींच्या हस्ते सुवर्ण कट्यार देण्यात आली.
संपूर्ण भारतभरातून सूर नवा ध्यास नवा या स्पर्धेत पाच हजार स्पर्धकांनी आपले नशीब आजमावले होते. त्यापैकी १६ स्पर्धक प्रत्यक्ष कार्यक्रमात होते. या स्पर्धेत गायनाशी संबंधित महत्त्वाचे धडे स्पर्धकांना मिळाले. १६ पैकी ६ शिलेदार अंतिम फेरीत पोहोचले होते. यामध्ये आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड या सहा स्पर्धकांच्या नावाचा समावेश होता. त्यातील उत्कर्ष वानखेडे याने स्पर्धा जिंकून राजगायक होण्याचा किताब पटकावला. गेल्या वर्षी अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ही विजेती ठरली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी अतिशय उत्साहात पार पडली. विजेतेपद जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये मोठी चुरस रंगली होती. गाण्याची मैफल आणि संगीत युद्ध या अंतिम फेरीमध्ये बघायला मिळाले. यामध्ये उत्कर्षने बाजी मारली.
सुवर्ण कट्यार देत सन्मान
राजगायक ठरलेल्या उत्कर्ष वानखेडे याला चंदुकाका सराफ अँड सन्स यांच्याकडून सुवर्ण कट्यार देण्यात आली. तसेच केसरी टूर्सतर्फे काश्मीर टूर आणि तोडकर संजीवनूकडून इलेक्ट्रीक स्कूटर भेट देण्यात आली. शिवाय कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपयेही देण्यात आले. संज्योती जगदाळे ही या कार्यक्रमाची उपविजेती ठरली. तिला कलर्स मराठीकडून एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. केसरीकडून तिला केरळ टूर, महाभृंगराज ऑइलकडून २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर आरोही प्रभुदेसाई ही दुसरी उपविजेती ठरली असून तिला कलर्स मराठीकडून ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. केसरी टूर्सकडून तिला हिमाचल टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1574084308968488962?s=20&t=3u-RwiNniW1X_yXdGKLz2g
Singing Reality Show Utkarsha Wankhede Winner