मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला कॉस्च्युम स्टायलिस्टने बॉलिवूड गायक – संगीतकार राहुल जैन विरोधात घरी बोलावून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार ओशिवरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे बॉलिवूड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तसेच, बॉलिवूडमधील महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ११ ऑगस्ट रोजी जैनच्या फ्लॅटवर गेली होती. सामान दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला आपल्या बेडरूममध्ये नेले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही महिला कॉस्च्युम स्टायलिस्ट म्हणून स्वतंत्र काम करते. तिने विरोध केल्यावर जैनने तिला मारहाण करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत जैनविरोधात एफआयआर नोंदवला आहे.
जैनला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. राहुल जैन याने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे राहुलने म्हटले आहे. तक्रारदाराने ओशिवरा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जैन याने महिलेशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला आणि तिच्या कामाचे कौतुक केले. यानंतर आरोपीने फिर्यादीला त्याच्या अंधेरी येथील फ्लॅटवर बोलावले आणि तिच्याशी गैरकृत्य केले, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
जैन म्हणतो…
राहुल जैनने त्याच्यावरील आरोप नाकारण्याबरोबरच संबंधित महिलेला आपण ओळखतच नसल्याचे सांगितले आहे. महिलेचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे त्याने म्हटले आहे. यापूर्वीही एका महिलेने माझ्यावर असेच आरोप केले होते, पण मला न्याय मिळाला. ही महिला तिची साथीदार असू शकते असे जैन म्हणाला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बॉलिवूड गीतकार आणि लेखकाने राहुल जैन विरोधात बलात्कार, जबरदस्ती गर्भपात आणि फसवणूक यासह विविध आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता.
Singer Rahul Jain Booked Rape Case
Entertainment Bollywood