इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम कामगिरी केली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अचानक घडलेल्या घडामोडी आणि मग अस्तित्वात आलेले सध्याचे शिंदे – फडणवीस सरकार यातही फडणवीस यांचे स्थान आणि भूमिका महत्त्वाची आहे. दुसरीकडे मनोरंजन विश्वात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील कायम चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीस यांची पत्नी एवढीच त्यांची ओळख नाही. तर त्यांनी स्वकर्तृत्वाने स्वतःचे स्थान गायन क्षेत्रात निर्माण केले आहे. या प्रवासात त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. तरीही अमृता या बेधडकपणे मागे वळून न पाहता पुढे जाताना दिसत आहे. अमृता यांचा हा बेधडकपणा लोकमत सखीच्या मंचावर देखील नुकताच दिसला.
अमृता फडणवीस यांच एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. त्यामध्ये त्या वेगळ्या लूकमध्ये दिसून आल्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याची पत्नी इतक्या मोकळेपणाने सोशल लाईफ, सोशल मीडियात वावरताना पहिल्यांदाच दिसली, यातली आव्हानं काय होती? कधी कुणी तुम्हाला अडवलं का किंवा वरून काही पॉलिटिकल प्रेशर आले का?, असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, “मला घरातून कोणतंही प्रेशर नाही. मी जर कुठे चुकले तर मला घरचे सल्ला देतात आणि मी ते ऐकूनही घेते. त्यानुसार मी बदलही केले आहेत. माझ्यावर कुणाचा राजकीय दबाव नाही आणि मी तो घेतही नाही. परंतु घरच्यांनी दिलेला सल्ला मात्र नेहमी ऐकते.” हे सांगतानाच माझ्यावर कुणी प्रेशर आणूही शकत नाही आणि मी कुणाला घाबरत नाही, असं अमृता फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. ‘लोकमत सखी डॉट कॉम’च्या संपादिका मेघना ढोके यांनी अमृता फडणवीस यांच्याशी संवाद साधला.
त्याचसोबत सतत होणाऱ्या ट्रोलिंगवरही अमृता फडणवीसांनी उत्तर दिले. ट्रोलर्सचा सामना करण्यासाठीचे बळ मला माझ्या घरातून मिळते. कोणतीही गोष्ट करताना मला त्याची प्रेरणा माझा अंतरात्मा देतो. आपण जे आहोत तसंच राहिले पाहिजे. कोणी काही म्हणालं तर त्याकडे मी लक्ष देत नाही, असा टोला त्यांनी टीकाकारांना लगावला आहे..
Singer Amruta Fadnavis Interview Answer Various Questions