मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात एकूणच दैनंदिन जिवनशैलीत मोठा बदल झाल्याने अनेकांना वजन वाढीची समस्या जाणवत आहे. विशेषतः बॉलीवूड मधील कलाकार असो की संगीतकार – गायक यांना देखील वजन वाढीबद्दल चिंता वाटत असते. सहाजिकच आजच्या काळात बहुतांश जण वेट लॉस म्हणजे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु सर्वांना यश येत नाही, मात्र एका गायकाने प्रचंड वाढत्या वजनावर मात करत वजन कमी केले आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अदनान सामी सध्या नवीन लूकमुळे म्हणजेच आपल्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत. अदनान सामी हा अनेकदा आपल्या वजनामुळे ट्रोल झाला होता. काही वर्षांपूर्वी त्याचं वजन २२० किलो इतके होते. परंतु आता त्याचे वजन केवळ ७५ किलोंवर आले आहे. या मागे त्याची मेहनत आहेच, पण स्ट्रिक्ट डाएट आणि फिजिकल अॅक्टिव्ह असणे हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. अदनान हा सन २००५ मध्ये अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला होता. परंतु काही वेळानंतर तो जेव्हा समोर आला तेव्हा तो खुप बारीक झाला होता. त्याला ओळखणेही कठीण झाले होते.
याला कारण म्हणजे सन २००५ मध्ये लिम्फेडेमासाठी त्याने एक शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याला ३ महिने आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे त्याचे वजन अधिकच वाढले होते. त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आपले कुटुंब आणि मित्रांच्या मदतीनं ह्युस्टनमध्ये एक न्युट्रिशनिस्टच्या सल्ल्यानुसार वेट लॉसचा प्रवास सुरू केला. त्यानं जवळपास १६ महिन्यांमध्ये सुमारे १५५ किलो वजन कमी केलं. आपण वजन कमी करण्यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचे त्याने सांगितले होते.
विशेष म्हणजे अनेकदा काही जण वजन कमी करण्यासाठी लिपोसक्शन सर्जरी करून घेतात. परंतु २२० किलोच्या व्यक्तीसाठी अशाप्रकारे फॅट हटवणे अशक्य होते. जेव्हा त्याने वेट लॉसचा प्रवास सुरू केला तेव्हा त्याने मॅश केलेले बटाटे, नॉन व्हेज आणि चीज केक खाल्ला नाही. त्यानंतर त्या दिवसापासून त्याने लो कार्ब आणि हाय प्रोटिन फूड सुरू केले. तसेच ह्युस्टनच्या न्यूट्रिशनिस्टद्वारे अदनान सामीची इमोशनल इटिंगची सवय सोडवण्यात आली. त्यानंतर त्याला लो कॅलरी असलेले पदार्थ खाण्यास देण्यात आले.
त्याचप्रमाणे डाएटमध्ये ब्रेड, अनहेल्दी फूड, भात यासारखे पदार्थ सोडवण्यात आले. त्याला केवळ सॅलड, मासे आणि उकडलेली डाळ खाण्याचा सल्ला देण्यात आला होता. सुरूवातीला त्याला साखरेशिवाय चहा देण्यात येत होता. दुपारच्या जेवणात सॅलड आणि मासे खाण्यास देण्यात येत होते. रात्री त्याला भात आणि चपातीशिवाय साधी उकडलेली डाळ किंवा चिकन देण्यात येत होतं. तो केवळ शुगर फ्री ड्रिंक घेत होता. सकळाच्या नाश्त्यात त्याला पॉपकॉर्न खाण्यात देण्यात येत होते.
जेव्हा त्याचे वजन ४० किलो कमी झालं तेव्हा तो ट्रेडमिलवर चालण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्याला थोडा व्यायामही करण्यास सांगितला. विशेष म्हणजे भारतात प्रशांत सावंत हे त्याचे ट्रेनर होते. अदनान सामीकडून आठवड्यात ६ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ एक्सरसाईज करवण्यात आले. दर महिन्याला यानंतर त्याचं वजन १० किलो कमी झालं. सध्या त्याचे वजन ७५ किलो आहे. परंतु आता आणखी वजन कमी केल्यास त्याला त्रास होऊ शकतो.