इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळातच तहसिलदार व पोलिसही दाखल झाले. वादळी वारा व मुसळधार पावसामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उदघाटन झाले होते. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पुतळ्याचे काम चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे पुतळा कोसळल्याचा आरोप केला आहे. आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्देवी बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यामुळे खराब दर्जाचे काम करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जयंत पाटील यांनी केली ही टीका
मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय होते. त्यामुळे या निर्माण कार्याच्या दर्जाची, गुणवत्तेची काळजी घेतली गेली नाही. हे इव्हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची एवढंच काम निष्ठेने सुरू आहे.राज्यभर सुरू असलेली रस्त्याची कामे देखील सुमार दर्जाची आहेत. महाराजांचा पुतळा बनवताना देखील असाच घोटाळा केला असणार. त्यामुळेच तेथील भौगोलिक परिस्थितीत पुतळा उभा राहू शकला नाही. ही सर्वस्वी महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे.
केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव वापरायचं. त्यांचे आचार, विचार, कृतीचा सन्मान होतोय का याबाबत सरकारला घेणेदेणे नाही. जाहीर निषेध!