इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
भाग ११ स्थान १७ वे
श्रीधर स्वामी यांची जन्मभूमी – लाडाची चिंचोळी
श्रीदत्त संप्रदायात अतिशय थोर संत विभूती होवून गेल्या आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका पाहिल्यावर मनुष्य नतमस्तक झाल्या शिवाय रहत नाही. श्रीदत्त परिक्रमेच्या निमित्ताने अशा थोर महात्म्यांच्या कार्याची माहिती होते. आज आपण ज्या दत्त क्षेत्राचा महिमा पाहणार आहोत त्या स्थानाचे नाव आहे. लाडाची चिंचोळी श्रीधर स्वामी यांची ही जन्मभूमी दत्त भक्तांना श्री क्षेत्र पीठापूर आणि श्री क्षेत्र कर्दळीवन या दोन्ही स्थानांची माहिती झाली ती श्रीधर स्वामी यांच्यामुळे! श्रीधरस्वामी केवळ दत्त भक्त नव्हते तर त्यांना गुरुदेव दत्तांचा अनुग्रह झालेला होता. एवढेच नाही तर त्यापूर्वी साक्षांत रामदास स्वामी आणि प्रभुरामचंद्र यांचीही कृपा त्यांच्यावर झाली होती. तर अशा या महान संतांचे जन्मस्थान असलेल्या दत्त क्षेत्राचे नाव आहे.
श्री क्षेत्र लाडाची चिंचोळी
श्री क्षेत्र पीठापूर आणि श्री क्षेत्र कर्दळीवन या दोन्ही स्थानांना प्रकाशात आणणारया श्रीधर स्वामींची जन्मभूमी श्रीधरस्वामींनी श्री दत्तसंप्रदाया साठी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. गेल्या काही दशकातील ज्या दोन श्रीदत्त स्थानांनी सर्वांना वेड लावले ती श्री क्षेत्र पीठापूर आणि श्री क्षेत्र कर्दळीवन या दोन्ही स्थानांना प्रकाशात आणण्यासाठी श्रीधरस्वामींचीच प्रेरणा होती. इतकेच नव्हे तर त्यांच्याच संकल्पाने ही स्थाने प्रकाशीत झाली असे म्हणता येईल.
प. प. भगवान श्रीधरस्वामी यांचे जन्मठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र लाडाची चिंचोळी. हे स्थान गाणगापूर पासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर आळंद तालुक्यामध्ये आणि गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आहे. श्रीधरस्वामी हे दत्तात्रेयांचे अवतार होते.
कोण होते श्रीधरस्वामी?
श्रीधरस्वामींचे मूळचे नाव श्रीधर नारायण पतकी असे होते.त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील ‘लाडचिंचोळी’ या गावी दि. ७ डिसेंबर १९०८ साली मार्गशीर्ष पोर्णिमेला म्हणजेच दत्तजयंतीला झाला.
लहानपणापासून त्यांना कथा-कीर्तनाची आवड होती. वडिलांच्या पश्चात त्यांच्या मातोश्रींनी त्यांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हापासूनच त्यांची श्रीरामावर श्रध्दा बसली होती. लहानपणीच त्यांनी सौरसूक्त, रूद्र, वैश्वदेव, त्रिसूपर्ण इ. ची संथा घेतली होती. लौकिक दृष्टीने शालेय विद्याभ्यासाबरोबर वैदिक धर्मकर्माचाही अभ्यास ते करीत असत. १९२४ साली ते पुण्यात शिक्षणासाठी आले.
पुणे विद्यार्थीगृहात ते विद्यार्थी व शिक्षकात अतिशय प्रिय होते. देशासाठी, समाजासाठी व धर्मासाठी कार्य करण्याचे बीज याच काळात त्यांच्या मनात खोलवर रूजले गेले. भारतीय आर्य संस्कृती, वेद, उपनिषदे, पुराणे यावर त्यांची श्रध्दा होती. समर्थ रामदासांचे चरित्र वाचून त्यांनी केलेल्या तपासारखे तप आपणही करावे असे त्यांना वाटू लागले. सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी जीवन समर्पित करावयाचे असे त्यांनी ठरविले होते.
दासनवमीच्या दिवशी श्रीधरांना समर्थांचे दर्शन झाले. सन १९२७ च्या नवरात्रात दस-याचे दिवशी सीमोल्लंघन करून ते तपासाठी पुणे सोडून सज्जनगडावर पोहोचले. ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत त्यांनी समर्थांच्या समाधीचे व श्रीराम प्रभूंच्या मूर्तींचे दर्शन घेतले आणि गडावर श्रीधरबुवा रामदासी म्हणून राहू लागले. जप, तप, सेवा, अभ्यास, दासबोध वाचन, करूणाष्टके पठण असा त्यांचा नित्याचा परिपाठ असे. १९३० च्या दासनवमीच्या दिवशी श्रीधरांना समर्थांचे दर्शन झाले. श्रीधरांना या काळातच विदेह अवस्था प्राप्त झाली.
आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी दर्शन दिले
श्री समर्थांच्या आज्ञेने गडाच्या दक्षिणेच्या बाजूने उतरून, जंगलातून गोकर्ण-महाबळेश्वरला गेले. त्याठिकाणी शिवानंद योगी व स्वामींची भेट झाली. अतूट नाते निर्माण झाले. पुढे ते शिवानंदांच्या आश्रमात कर्नाटकात शिगेहळ्ळीला राहिले. तेथे तप: साधना केली. असेच पुढे जाता जाता कोडसाद्री या पर्वतावर श्रीधर तप करीत असता त्यांना आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी दर्शन दिले. त्यांना ब्रम्हासनावर बसविले.
कानडी, इंग्रजी, संस्कृत व मराठी भाषेतून ग्रंथलेखन
सन १९३५ चे सुमारास ते पुन्हा गडावर आले. त्यांचे हातून रामगौरव, श्रीरामपाठ, श्रीसमर्थपाठ, मारूति माहात्म्य, स्वात्मनिरूपण हे साहित्य निर्माण झाले. कानडी, इंग्रजी, संस्कृत व मराठी भाषेतून तत्वज्ञानपर चिंतन त्यांनी ग्रंथरूपाने लिहिले.
१९४२ ला संन्यास दीक्षा
सन १९४१ मध्ये शिवानंदस्वामींनी देह ठेवल्यावर शिगेहळ्ळीला मठाची व्यवस्था श्रीधरांनी पाहिली. मठाचे नूतनीकरण व विस्तारीकरण केले. नंतर गडावर आले व पुढे महाराष्ट्रात भ्रमण करून पुन्हा सन १९४२ साली ते शिगेहळ्ळीला परत आले. त्या आश्रमात त्यांनी “विजयादशमी”च्या मुहूर्तावर संन्यासदीक्षा घेतली. आता श्रीधरबुवा हे ‘श्रीधरस्वामी’ म्हणून प्रसिध्दीस पावले. श्रीधरस्वामींच्या प्रतिभासंपन्नतेने ते अनेकांचे श्रद्धास्थान बनले.
‘समर्थ सेवा मंडळाची’ स्थापना
१९४७ पर्यंत कर्नाटकातील संचारानंतर उत्तर भारतात बहुतेक सर्व श्रद्धेय तीर्थक्षेत्रांना भेटी देत पारायणे, यज्ञयागादि कर्मे केली. समर्थांची ३५० वी जयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली. लोकांच्या अडीअडचणी उपासनामार्गाने सोडविण्यासाठी मार्गदर्शन करू लागले. आता त्यांच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र पसरला होता. सन १९४९ साली गुरूपोर्णिमेला श्रीधरस्वामी गडावर आले. ‘समर्थ सेवा मंडळाची’ स्थापना केली. गडावर अनेक सुधारणा केल्या. समर्थांच्या वाड.मयाचा, तत्वज्ञानाचा प्रसार आता जोरात सुरू झाला. समाजजागृती करून धर्मप्रसाराचे त्यांचे कार्य अविरत सुरू झाले.
वरदपूर येथे “श्रीधराश्रम” स्थापना
१९५३ साली वरदपूर या पुण्यभूमीवर “श्रीधराश्रम” स्थापन केला. हे स्थान अगस्ती ऋषींची तपोभूमी होय. हे क्षेत्र कर्नाटकात सागर जिल्ह्यात आहे. येथे दुर्गाम्बा देवीचे मंदिर आहे. अनेक पवित्र स्थानी, उत्सव व धर्मपारायणादि कार्ये सुरू झाली.
वरदहळ्ळी (वरदपूर),येथे महासमाधी
इतके असूनही श्रीधरस्वामींना एकांतवास प्रिय असे. त्यांनी एकूण १३ वर्षे एकांतवास केला होता. ज्यांचे मन सतत आत्मारामाशी (भगवंताशी) रममाण होते. तोच एकांत होय. अशा या श्रीधरस्वामींनी १९६७ साली पुन्हा एकांत साधना सुरू केली. श्रीधरस्वामींनी चैत्र वद्य व्दितीयेला दि. १९ एप्रिल १९७३ साली रोजी सकाळी नऊच्या सुमारास ‘ओंकाराचा तीन वेळा उच्चार करून वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली.
श्री क्षेत्र पीठापूर आणि श्री क्षेत्र कर्दळीवन या दोन्ही स्थानांना प्रकाशात आणले
श्रीधरस्वामींनी श्री दत्तसंप्रदाया साठी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. गेल्या काही दशकातील ज्या दोन श्रीदत्त स्थानांनी सर्वांना वेड लावले ती श्री क्षेत्र पीठापूर आणि श्री क्षेत्र कर्दळीवन या दोन्ही स्थानांना प्रकाशात आणण्यासाठी श्रीधरस्वामींचीच प्रेरणा होती. इतकेच नव्हे तर त्यांच्याच संकल्पाने ही स्थाने प्रकाशीत झाली असे म्हणता येईल.
पीठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाची स्थापना
श्रीधरस्वामींचे शिष्य प. प. सज्जनगड रामस्वामी यांनी पीठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाची स्थापना केली. याचबरोबर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामुळे श्रीदत्तभक्तांना एक विलक्षण पर्वणी मिळाली.
कर्दळीवनाचे महात्म्य प्रकाशात आणले
श्रीधरस्वामी १९६० साली कर्दळीवनामध्ये गेले होते. त्यांचे शिष्य गाणगापूरचे बटू महाराज नंतर कर्दळीवनात गेले होते. त्यांच्याच प्रेरणेने गाणगापूर येथील काही पूजारी १९९९ साली प्रथम कर्दळीवनामध्ये गेले. त्यानंतर कर्दळीवनाची महिती हळूहळू सर्वांना कळू लागली आणि ते प्रकाशात आले. श्रीधरस्वामींच्याच कृपेने आणि संकल्पाने गेल्या दशकभरामध्ये दत्तसंप्रदायामध्ये एक नवचैतन्य पसरले आहे.
लाडाची चिंचोळी हे श्रीधरस्वामींचे जन्मठिकाण म्हणूनच अतिशय पवित्र आहे. भाविक भक्तांनी भेट देऊन तेथील अनुभूती घ्यावी असे हे स्थान आहे.
संपर्क: श्रीधर स्वामी जन्मभूमी सेवा समिति, श्रीक्षेत्र लाडाची चिंचोळी ता. आळंद जिल्हा गुलबर्गा
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण श्रीधरस्वामी यांचे जन्मस्थान लाडाची चिंचोळी या स्थानाचे दर्शन घेतले.उद्या आपण श्रीक्षेत्र गाणगापूर येथे जावू या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Shridhar Swami Ladachi Chincholi by Vijay Golesar
Dattatraya Religious