पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून आज पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येतात, विशेषतः श्रावणातील सोमवारांना खूप महत्त्व असते. श्रावणी सोमवार हा भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी करण्यात येतो. श्रावणात महादेव तथा शंकराच्या भगवान शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी खूपच गर्दी दिसून येते. त्यातच श्रावणी सोमवारी भाविकांची अलोट गर्दी असते.
महादेवाच्या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालण्यास मनाई असते. शंकराच्या बहुतेक मंदिरांमध्ये लोकांनी पूर्ण गोल प्रदक्षिणा घालू नये म्हणून परिक्रमा मार्ग मध्येच बंद केलेला असतो. शिवलिंगाची अर्धी परिक्रमा घालण्याचा शास्त्रात नियम आहे. शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींना अनेक महत्वाची करणं असतात आणि त्याही आधी आपलं म्हणजेच भक्ताचं हित त्यात सामावलेलं असते.
भगवान शिवशंकराची पूजा लिंगरूपात केली जाते. भगवान शिवाने कधीही अवतार घेतला नाही. शिव हे काळांचा काळ अर्थात महांकाळ आहेत. जीवन मृत्यूचा चक्र त्यांना स्पर्श करू शकत नाही. शिव हे देवांचा देव आहेत. ते एकमात्र परब्रह्म आहेत. त्यामुळेच त्यांची पूजा निराकार रूपात केली जाते. एक प्रकारे या रूपातून समस्त ब्रह्मांडाचीच पूजा होते. कारण ते समस्त जगाचे मूळ कारण आहेत.
विशेष म्हणजे भगवान शिवाची पूजा लिंगरूपातच अधिक फलदायी आहे. शिवाचे मूर्तीपूजनही श्रेष्ठ मानले गेले आहे. परंतु लिंगपूजन सर्वश्रेष्ठ आहे. शिवपिंडीला प्रदक्षिणा घालताना जलाधारी अर्थात पिंडीच्या समोर आलेल्या भागापर्यंत येऊन मागे वळावे आणि प्रदक्षिणा पूर्ण करावी. शास्त्रानुसार अशा रीतीनेच शिवलिंगाची प्रदक्षिणा केली पाहिजे.
शिवपुरणानुसार शिवलिंग प्रगट झाले तेव्हा ते अग्निरूपात होते. पृथ्वीवर शिवलिंग स्थापित करायचे कसे हा प्रश्न होता. सर्व देवतांनी देवी पार्वतीला प्रार्थना केली. देवीने आपल्या तपसामर्थ्याने जलाधारी प्रगट केली. पार्वती ही शक्ती रूप आहे. जलाधारीतून शक्ती प्रक्षेपित होत असते. सर्वसामान्य भक्तांनी जलाधारी ओलांडल्यास त्यांना त्या शक्तीमुळे त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे शिवपिंडीची अर्धपरिक्रमाच केली पाहिजे.
शिवलिंगावर अभिषेक घातला की तो अभिषेक जिथून बाहेर पडतो, त्याला निर्मली किंवा जलधारी किंवा सोमसूत्र असं म्हणतात. त्या सोमसूत्रात काय असतं ? तर तिथे ऊर्जा असते आणि ही ऊर्जा अतिशय गरम आणि शक्तिशाली असते. शिवलिंग हे शिव आणि शक्ती यांचं प्रतिक आहे. त्या पिंडीला शाळुंकेने धरून ठेवलं आहे.
शाळुंका म्हणजे शक्ती, जी अतिशय शक्तिशाली असते आणि जल, दूध किंवा ज्याने अभिषेक घातला आहे, तो अभिषेक जलधारीतून बाहेर पडताना ती ऊर्जा त्यात मिसळून जाते. ही ऊर्जा मानवाच्या शरीरासाठी चांगली नाही. आपण ते सोमसूत्र पायाने ओलांडलं की ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व मनावर होतो अशी धारणा आहे.
सोमसूत्र ओलांडल्याने वीर्य निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो असे म्हणतात. आपल्या शरीरातील पाच प्रकारच्या वायूंवरही याचा वाईट परिणाम होतो. आपण जांभई देतो, ही कृती देवदत्त वायुमुळे होते तसेच धनंजय वायू, हा वायू आपल्या संपूर्ण शरीरात इकडून तिकडे फिरत असतो.
शरीराचे सगळे अवयव नीट काम करावेत या प्रयत्नात हा वायू असतो आणि मृत्युनंतरही हा वायू आपल्या शरीरात त्याचं अस्तित्व राखून असतो; या दोन वायूंच्या प्रवाहात सोमसूत्र ओलांडल्याने अडथळा निर्माण होतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होतो. म्हणून शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही आणि निर्मली आली की परत फिरायचं. हा नियम आहे.
पण, सोमसूत्रावर जर गवत, पानं, दगड, विटा, लाकूड असं काही ठेवून ती निर्मली झाकून ठेवली असेल तर सोमसूत्र ओलांडण्याचा दोष लागत नाही. पण तरीही ‘शिवस्यार्ध प्रदक्षिणा’ हे म्हटलेलं आहे म्हणजेच शिवाची प्रदक्षिणा ही नेहमी अर्धीच घालावी. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने राज्यभरातील ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र, श्री त्रंबकेश्वर, वेरूळची श्री घृष्णेश्वर, परळीचे वैद्यनाथ, औंढा नागनाथ, आणि भीमाशंकर यासह विविध शिवमंदिर तथा महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून येत आहे.
Shravan Somvar Bhagvan Shankar Pinda Purna Pradakshina Religious