मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यासह राज्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील दहिदी येथे शेतकरी महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. शेतात एकटी असलेल्या या महिलेवर अज्ञात इसमाने फावड्याने घाव घातले. या महिलेच्या शरीराचे तुकडे करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येचे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. अशाच धर्तीवर मालेगाव तालुक्यातील दहिदी येथे घटना घडली आहे. दहिदी येथील शेतकरी महिला सुमनबाई भास्कर बिचकुले ही महिला शेतात एकटीच काम करीत होती. तर तिचे पती भास्कर हे मका विक्रीसाठी बाजारात गेले होते. लागवड केलेल्या कांद्याना पाणी भरण्याचे काम सुमनबाई करीत असतानाच अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर फावड्याने हल्ला केला. सर्वप्रथम सुमनबाईच्या दोन्ही पायांचे तुकडे अज्ञाताने केले. त्यानंतर या क्रूर अज्ञाताने फरफटत सुमनबाईला जंगलाच्या दिशेने नेले. त्यानंतर तेथे त्याने सुमनबाईच्या छातीवर आणि गळ्यावर जोरदार वार केले. तसेच, तिचे मुंडकेही छाटले. सुमनबाईच्या शरीराचे तुकडे करुन तिची हत्या करणारा क्रूरकर्मा लागलीच फरार झाला.
भास्कर बिचकुले हे घरी आले. त्यांनी शेतात पाहिले असता सुमनबाई दिसल्या नाहीत. त्यांनी बरीच शोधाशोध केली. अखेर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला. शेतालगत असलेल्या जंगलात सुमनबाईच्या शरीराचे तुकडे छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या भयंकर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shocking Malegaon Brutal Murder Farmer Women
Crime Nashik