मुझफ्फरपूर (बिहार) – येथील नेत्र रूग्णालयात मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर डोळे गमावलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यानंतर आता या रुग्णांचे थेट डोळे काढण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत १५ जणांचे डोळे काढावे लागले आहेत. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. तसेच, परिसरात अतिशय चिंतेचे वातावरण आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूर नेत्र रूग्णालयात २६ जणांची दृष्टी गेल्याची घटना समोर आली असून या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. एका ट्रस्टद्वारे चालवल्या जाणार्या मुझफ्फरपूर आय हॉस्पिटलमध्ये पीडितांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पट्टी उघडल्यानंतर त्याला काहीच दिसले नाही. याबाबत सिव्हिल सर्जन यांच्याकडे तक्रार आल्याने निष्काळजीपणाचा हा प्रकार उघडकीस आला. गंभीर संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांना पाटण्यात पाठवण्यात आले होते.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा शस्त्रक्रियेच्या वस्तूमध्ये आधीच संसर्ग होण्याची शक्यता असते. २२ नोव्हेंबर रोजी एकूण ६५ रुग्णांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या रुग्णांमध्ये खगरिया, समस्तीपूर, मोतिहारी आणि इतर जिल्ह्यातील रुग्णांचाही समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात नऊ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. तपासानंतर त्यांचे डोळे काढण्याबाबत निर्णय घेतला जाईल. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही संख्या वाढू शकते. दुसरीकडे, २२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झालेल्या सर्वांमध्ये संसर्गाची शक्यता असतानाही आरोग्य विभागाने त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले नाही. या विभागाकडे अन्य ५० रुग्णांची पुरेशी माहिती नाही किंवा त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
सदर घटना उघडकीस आल्यानंतर तीन दिवसांनी बुधवारी आरोग्य विभागाला जाग आली आणि त्यांनी नेत्र रुग्णालयाला पत्र पाठवून पीडितांची माहिती आणि रुग्णालयाशी संबंधित कागदपत्रे मागवली. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पीडितांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी मंगळवारी २ पीडितांचे डोळे काढण्यात आले होते, तर ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी नेत्र रुग्णालयाने हे प्रकरण दाबण्यासाठी घाईघाईत ४ रुग्णांचे डोळे काढले होते.
त्यानंतर हे प्रकरण मुझफ्फरपूरसह पाटणामध्येही गाजले होते. आरोग्य विभागाचे कार्यकारी संचालक संजय कुमार सिंग यांच्यासह इतर अनेक उच्च अधिकार्यांचे फोन आल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनय कुमार शर्मा आपल्या टीमसह हॉस्पिटलमध्ये पोहोचले. नेत्र रुग्णालयात २२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झालेल्यां रुग्णांच्या डोळ्यांच्या नुकसानीची प्रक्रिया अद्याप सुरूच असून, त्यानंतर पाच दिवस चाललेल्या ऑपरेशनमध्येही गोंधळ समोर येत आहे.
विशेष म्हणजे २३ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत शस्त्रक्रिया झालेल्या काही रुग्णांना डोळ्यांच्या देखील समस्या निर्माण झाल्या आहेत. सदर रूग्ण हे आता उपचारार्थ खासगी रूग्णालयात पोहोचत आहेत. मात्र, खासगी रुग्णालये त्यांच्यावर उपचार करण्यास टाळाटाळ करत आहेत. या घटनेनंतर मुझफ्फरपूर नेत्र रुग्णालयातील ओपीडीही बंद होती. त्यामुळे डोळे दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांना परतावे लागले. यामधील अनेकांना ऑपरेशनची तारीख आधीच दिली गेली होती. रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीत गोंधळ झाला होता.
डॉ. प्रणव कुमार म्हणाले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडितांना भरपाई दिली जाईल. तसेच संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या तपासाशिवाय अनेक मुद्यांवर रुग्णालय व्यवस्थापनाला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर राज्य आरोग्य समितीचे कार्यकारी संचालक संजय कुमार सिंह यांनी मुझफ्फरपूर जिल्हा प्रशासन आणि सिव्हिल सर्जन यांना या प्रकरणी संबंधित रुग्णालयाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. विभागाच्या सूचनेनुसार नेत्र रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर सील करण्यात आले आहे.