नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला नाशकात मोठे खिंडार पडणार असल्याची चिन्हे आहेत. कारण, १० पेक्षा अधिक नगरसेवक ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब अतिशय परिणामकारक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. आता शिंदे यांनी आपल्या गटाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. होता होईल तेवढी शिवसेना खिळखिळी करण्याचा मनसुबा घेऊन वाटचाल करणाऱ्या शिंदे यांनी नाशिकवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक पंचायत समितीचे माजी संभापती अनिल ढिकले, माजी नगरसेवक बंटी तिदामे आदींना फोडण्यात त्यांनी यशही मिळवले आहे. पण अजूनही हवे त्या प्रमाणात यश न मिळाल्याने शिंदे प्रयत्नशील आहेत. असे असताना ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक स्वतःहून शिंदे गटात दाखल होण्याची तयारी करीत आहेत. डझनभर नगरसेवकांचा यात समावेश असल्याचे बोलले जाते.
शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती अनेक नगरसेवकांना पक्ष सोडण्यास भाग पाडत असल्याचा आरोप केला जात आहे. ज्या प्रभागात ठाकरे यांचे नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केले त्यांच्या विरोधात आताचे काही पदाधिकारी हे पर्याय निर्माण करीत आहेत. किंबहुना त्यांना ताकद देत असल्याचेही बोलले जाते. हर्षदा गायकर यांनी दोन दिवसांपूर्वी विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने लावलेल्या फलकावर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची छबी झळकली. त्यामुळे त्या ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
यापूर्वी ठाकरे यांनी मातोश्रीवर नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांना बैठकीपासून पद्धतशीरपणे दूर ठेवून मोजके पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळीही काही स्थानिक नेत्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. खासकरुन सुधाकर बडगुजर आणि सुनील बागुल यांच्यात अंतर्गत कलगीतुरा असल्याचे बोलले जाते. एकीकडे पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जीवाचे रान करीत आहेत. स्थानिक पदाधिकारी मात्र आपण म्हणू तीच पूर्व दिशा अशा अविर्भावात वागत आहेत. त्यांची हीच कृती पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात दाखल होण्यास किंवा शिवसेना सोडण्यास भाग पाडत असल्याचेही बोलले जात आहे. ठाकरे यांनी यात लक्ष घालावे अन्यथा नुसतेच माजी नगरसेवक नाही तर पदाधिकारीही पक्षाला जय महाराष्ट्र करतील, अशी भावना खाजगीत बोलले जात आहे.
Shivsena Uddhav Thackeray Group Politics Left Leaders