नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कुणाला मिळणार ठाकरे गटाला की शिंदे गटाला याची उत्सुकता अद्यापही ताणलेलीच राहणार आहे. कारण, आज केंद्रीय निवडणूक आयोगात यासंदर्भात सुनावणी झाली. ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकीलांनी आजच्या सुनावणीत जोरदार युक्तीवाद केला. अखेर आता या प्रकरणी शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. आजच्या सुनावणीवेळी ठाकरे गटाच्यावतीने अनिल परब आणि सुभाष देसाई हे नेते उपस्थित होते. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड केले. त्यापाठोपाठ १३ खासदारांनीही शिंदेंना पाठिंबा दर्शविला. शिंदे गटाने अखेर भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे की, तेच खरी शिवसेना आहेत. अखेर हे प्रकरण निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. आणि दोन्ही गटांना तात्पुरते दुसरे चिन्ह देण्यात आले आहे. शिवसेनेतील या संघर्षावर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. आता याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेण्याचे आयोगाने जाहीर केले आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1615331443651280896?s=20&t=0DiK39_b0vAUCGQFqb_ujQ
Shivsena Symbol Election Commission Hearing Politics