मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला आणि ११ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. ही रक्कम अघोषित उत्पन्नातून असल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेपैकी १० लाख रुपयांच्या बंडलवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहिले होते. यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे.
संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी सांगितले की, १० लाखांची रक्कम ही शिवसेना पक्ष निधीची आहे. त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे अयोध्येचाही उल्लेख करण्यात आला. यावर आता एकनाथ शिंदे गटानेही संजय राऊत यांचा धूर्तपणा असू शकतो, असे उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, संजय राऊत अतिशय हुशार असून त्यांनी मुद्दाम एकनाथ शिंदे यांच्या नावावर १० लाख रुपये ठेवले असावेत.
केसरकर पुढे म्हणाले की, ‘कदाचित संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काहीतरी करायचे असेल. त्यासाठी त्यांना अयोध्येला जायचे आहे. संजय राऊत यांनी हा पैसा त्यांच्यासाठी राखून ठेवला असावा. या पैशाचा स्रोत दाखवावा लागेल. संजय राऊत यांनी हे पैसे जाणूनबुजून ठेवले असावेत, अशी भीतीही दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. या पैशावर संजय राऊत यांनी मुद्दाम एकनाथ शिंदे यांचे नाव लिहिले असेल तर ती फार मोठी चलाखी असू शकते. ते काहीही करू शकतात. या पैशाशी एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही. आम्ही गुवाहाटीमध्ये असतानाही आमदारांना पैसे दिल्याचे आरोप झाले. तेव्हाही आम्ही आमच्या हॉटेलच्या खोल्या आणि घरांची झडती घेण्यास सांगितले होते, असे केसरकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, औरंगाबाद येथील सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय राऊत यांच्या घरी मिळालेल्या पैशांवर माझे नाव असेल तर त्यांनाच विचारा. मी अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांनी ईडीला सांगितले की, ११.५० लाख रुपयांपैकी १० लाख रुपये पक्ष निधीचे आहेत. मात्र, त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांचे नाव का लिहिले गेले? याची चर्चा जोरात सुरू आहे.
दरम्यान, ही कारवाई शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी असल्याचे संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी आरोप केला आहे. अशा कारवायांमुळे आमचा आवाज दाबला जाणार नाही. सुडातून ही कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांचा आवाज थांबणार नाही. शिवसैनिकांचा आवाज त्याच जोमाने ऐकू येईल. संजय राऊतच लढतील आणि शिवसेनेला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ShIvsena Sanjay Raut Home Cash Money Politics