मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का देण्यासाठी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास सर्व तयारी केली. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर हेही शिंदे गटात सामील होण्याचे नक्की झाले. शिंदे हे किर्तीकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. यानंतर ते उद्धव यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले. पण, गजानन यांचा मुलगा अमोल कीर्तिकरची एंट्री झाली आणि मोठे नाट्य घडले.
उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल कीर्तिकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. वडिलांच्या शिंदे गटात जाण्यास अमोल यांनी विरोध केला. मुलाने वडिलांना सांगितले की, “शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत आपण उद्धवसाहेबांना सोडले तर देवही मला माफ करणार नाही. जगात माझ्यासारखा नीच माणूस नसेल.” यानंतर कीर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय बदलला.
शिवसेनेचा आणखी एक खासदार ठाकरेंची बाजू सोडून दसरा मेळाव्यात शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात होती. खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची विचारपूस केली. यानंतर कीर्तिकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे ते ठाकरे यांची साथ सोडणार हे जवळपास निश्चित झाले होते.
दरम्यान, शिंदे गटाने गजाजन कीर्तीकर यांना केंद्रात मंत्रिपद आणि त्यांच्या मुलाला विधानपरिषदेत संधी देऊ केल्याचेही समोर आले आहे. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आपल्या मुलाला उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे अमोल कीर्तिकर यांनीही शिंदे गटाला पाठिंबा देण्यास साफ नकार दिला. त्यानंतर गजानन कीर्तिकर यांनीही आपला निर्णय बदलत उद्धव ठाकरेंची बाजू न सोडण्याचा निर्णय घेतला.
गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. १९९० ते २००९ दरम्यान ते चार वेळा मालाड मतदारसंघाचे आमदार होते. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे १ लाख ८३ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. ते सलग दोन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.
Shivsena Rebel Politics Eknath Shinde MP
Uddhav Thackeray