मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता एकेक पाऊल पुढे टाकण्यास प्रारंभ केला आहे. ४० आमदारांची साथ आल्यानंतर शिंदे यांनी तब्बल १२ खासदारांचा पाठिंबा मिळविला आहे. त्यानंतर आता विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच त्यांनी त्यांच्या आपल्या गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांना जबाबारी देण्यास प्रारंभ केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर कदम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांवर टीकास्त्र सोडायला सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत मराठा समाजाचा मुख्यमंत्री नको होता असा थेट आरोपी कदम यांनी केला आहे. रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना त्यांच्या मुंबईतील कांदिवली येथील पालखी या निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या आणि रामदास कदम सारखा आक्रमक नेता पक्षासाठी आवश्यक असल्याचे सूचित केले. शिंदे यांनी रामदास कदम यांची शिवसेना पक्षाच्या नेतेपदी निवड केल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानंतर रामदास कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.
त्यानंतर शिंदे-कदम भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले.आपल्या राजकीय आयुष्याची ही इनिंग रामदास कदम यांनी पुन्हा त्याच जोशाने सुरु करावी, अशा शुभेच्छा शिंदे यांनी कदम यांना दिल्या. यावेळी रामदास कदम यांचे दोन्ही सुपुत्र आमदार योगेश कदम आणि सिद्धेश कदम, आमदार बालाजी कल्याणकर आणि कदम कुटुंबीय उपस्थित होते. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. तर उद्धव ठाकरे हे देखील अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या पदांवर नियु्क्त्या जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या नियुक्त्यांनुसार, शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दीपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे.
अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली. तर बाकी शिलेदराना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी शिंदे गटाकडून बरखास्त करण्यात आली होती. शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. मात्र शिवसेना पक्ष प्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड झाली आहे. उपनेते पदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
युवासेनेचे राज्य सचिव वरूण सरदेसाई यांची युवासेनेतूनच उचलबांगडी करण्यात आली आहे. सरदेसाई हे रश्मी ठाकरे यांचे भाचे, अर्थात आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू आहेत. त्यामुळे हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबालाच धक्का मानला जातो. वरुण सरदेसाईंच्या जागी किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे घराण्याला झटका देण्यासाठी शिंदेंनी थेट वरुण सरदेसाई यांच्या जागी किरण साळी यांची नेमणूक केली आहे.
आता खरी शिवसेना कुणाची? असा प्रश्न राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच विशेषता गावातील शिवसैनिक यांच्या मनात निर्माण झाला असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत कागदपत्र सादर करण्याचे आदेश ठाकरे आणि शिंदेंना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या नोटीसीविरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. यावर आता दि. १ ऑगस्टला सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
Shivsena Rebel Leader CM Eknath Shinde New Appointments of Leaders Politics