मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांच्या सहा जागांचा निकाल हाती आला आणि महाविकास आघाडीला धक्काही बसला. शिवसेनेच्या संजय पवारांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या पराभवाचं खापर शिवसेना नेते संजय राऊत अपक्षांवर फोडत आहेत. या निवडणुकीत घोडेबाजार झाला. काही घोड्यांना हरभरे टाकले होते. जिकडे हरभरे असतात तिकडेच घोडे जातात अशी टिका त्यांनी केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावंच समोर आणली आहेत. घोडेबाजार उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. या निवडणुकीत आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही आणि कोणता व्यापारही केलेला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली होती. इतक्या संख्येची मतं हादेखील आमच्यासाठी एक विजय आहे. काही लोकांनी आम्हाला मत देण्याचा शब्द दिला होता. पण ऐनवेळी दगाबाजी करुन आपलं खरं रुपच दाखवून दिलं. त्यांची यादी आमच्याकडे आहे, असेही ते म्हणाले. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानी पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आम्हाला मत दिले नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
अपक्षांनी हरभरे खाल्ले आहेत पण तरीही कोणीही हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, असा टोला राऊतांनी विरोधकांना लगावला आहे. घोडेबाजारातील घोड्यांमुळं सरकारवर काहीही फरक पडणार नाही. समोरच्यांनी दिल्लीची ताकद या निवडणुकीत वापरली आहे. या घोडेबाजारात जे विकले गेले त्यांची नोंद झाली आहे. काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली. शिवसेनेला कोणताही झटका लागलेला नाही. हा भाजपचाही फार काही मोठा विजय नाही, असंही ते म्हणाले.