मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना सुमारे १०३ दिवसानंतर पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला. मात्र इतके दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना अनेक शारीरिक व्याधी जडल्याची माहिती त्यांनी दिली. तुरुंगात राहिल्यामुळे माझी दृष्टी अधू झाली, मला बहिरेपणा आला, तुरुंगातून आल्याने माझे १० किलो वजन कमी झाले, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.
राऊत आणखी पुढे म्हणाले की, मी पंधरा-वीस दिवस सूर्यकिरण पाहिला नाही. तसेच अंधारही मी तीन महिन्यांनी पाहिला. कारण प्रखर लाईटमध्ये कोठडीत बसावे आणि झोपावे लागत होते. कोठडीत सहा-सात लाईट्स असतात. अंधार होत नाही तिथे, शंभर दिवस प्रकाशात राहिल्याने माझी नजर कमी झाली. मला दिसत नाही आता. नजरेचा फार त्रास झाला. आता सगळे अस्पष्ट दिसत असून अशा मला बऱ्याच व्याधी झाल्या. मी हार्ट पेशंट आहे. सात स्ट्रेंट आहेत. पण मी इस्पितळात नाही गेलो. मी तिथेच सहन केले. मला कानाने कमी ऐकू यायला लागले कारण आवाजच नाही. एकांतातवास काय असतो हे अनुभवले. चारीबाजूने फक्त भिंती दिसत होत्या. त्यामुळे स्वतःशी बोलत होतो, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
इतकेच नव्हे तर तुरुंगात राहिल्याने सर्व विसरायला होतं. माणसाने सर्व विसरावे याकरताच जेलची रचना झालेली आहे. मी सर्व विसरलो. मला आता मोबाईल चालवता येत नाही. मी मुलीकडून मोबाईल शिकून घेत आहे, असेही राऊत म्हणाले. तसेच, सूडाने ज्या कारवाया झाल्या आहेत त्यांना जामिनाच देत नाहीत. राजकीय सूडबुद्धीने या कारवाया केल्या जातात. वरिष्ठांच्या आदेशाने कारवाया केल्या जातात.
सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायामूर्तींची समिती स्थापन व्हावी किंवा जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी स्थापन व्हावी. सर्व पक्षीय समिती. यात विरोधी पक्षाला स्थान असायला हवे. तसेच आपण त्यांच्यासमोर म्हणजे भाजपसमोर आत्मसमर्पण केले असते अथवा ‘मूक दर्शक’ बनून बसलो असतो, तर आपल्याला अटक केली गेली नसती. मी स्वतःला युद्ध कैदी समजतो, सरकारला वाटते, की आम्ही त्यांच्यासोबत यूद्ध करत आहोत.
राऊत म्हणाले की, आपण महाराष्ट्राचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना कारागृहात पाहिले. त्यांची प्रकृती ठीक नाही. सरकार केवळ विरोधी पक्षात असलेल्यांनाच कारागृहात टाकणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी आपण जे काही आहोत, ते बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबामुळेच आहोत, असेही राऊत यावेळी म्हणाले. भारत जोडो यात्रा देशातील हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी या महत्वाच्या प्रश्नांच्या विरोधात निघाली आहे. यात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मग अशावेळी वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Shivsena MP Sanjay Raut Jail Health Issues