मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या ठाकरे गटाची धडाडती तोफ म्हणजेच खासदार संजय राऊत यांची अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधकांचा चांगला समाचार घेतला. त्यांनी विरोधकांना धोत्र्याच्या कडू बियांची उपमा दिली आहे. सध्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे निघाले आहेत. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, ‘मी गेल्या १०० दिवसांपासून तुरुंगात होतो. बाहेर काय सुरू होतं, ते आत राहून कळत नव्हते. बाहेर येऊन समजले की, आता उद्धव ठाकरेंची शिवसेना झाली आहे. पण, आमचा कणा मोडलेला नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, व लढत राहू.’
राऊत पुढे म्हणले की, ‘आमचे आयुष्य बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत गेले. एकच शिवसेना खरी आहे, ती म्हणजे बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील होय, बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया आहेत. हा महाराष्ट्र तसेच मुंबई कोणाच्या मागे आहे, ते त्यांना हळुहळू कळेलच.’
संजय राऊत यांचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यासाठी शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे. राऊतांच्या ‘मैत्री’ या निवासस्थानी समर्थकांनी गर्दी करायला सुरुवात केली असून डीजेच्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले जात आहे. ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. आता तुरुंगाबाहेर आल्यानंतर राऊत आपल्या जुन्या स्टाईलमध्ये परतले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, आता बाहेर आलोय, हळुहळू कामाला लागू. गेल्या ३५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांचा भगवा फडकत आहेत, तो तसाच फडकत राहणार. त्या भगव्याला कोणी हात लावाल, तर जळून खाक व्हाल. असे तेज त्या भगव्यात बाळासाहेबांनी निर्माण केलं आहे. आता तर मशाल आहे…’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे म्हटले की, विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या सांभाळाव्यात. आणि कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे” असेही यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही संजय राऊत यांना जामीन मिळाल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “टायगर इज बॅक” असे अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/Clyde_Crasto/status/1590259434764537858?s=20&t=WcZB41WIQvk_umcA2KaHAA
Shivsena MP Sanjay Raut First Reaction
Politics Patra chawl Scam ED Bail Court