मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक नेते, आमदार, खासदार इतकेच नव्हे तर विविध पदाधिकारी व शिवसैनिक बंडखोर शिंदे गटात सहभागी होत असल्याने ठाकरे गटाने एक शक्कल लढविली. आमचा उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा असून आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, अशा आशयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्याची मोहीम राबविण्यात आली. मुंबई, नवी मुंबई, ठाणेसह ठिकठिकाणी खोटे (बोगस) तथा बनावट शपथपत्र तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुमारे साडेचार हजार पेक्षा जास्त बनावट शपथपत्र सापडल्याची तक्रार शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन यासंदर्भात गुन्हे शाखेकडे तपास सोपीविण्यात आला आहे.
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी याबाबत गंभीर आरोप ठाकरे गटावर केला होता. तसेच अज्ञात व्यक्तीविरोधात निर्मल नगर पोलिसांनी बनावट शपथपत्र प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यात ४,६८२ बनावट शपथपत्र आढळून आली असून याप्रकरणी गंभीर स्वरुपाची कायदेशी कारवाई केली जावी, अशी मागणी म्हस्के यांनी केली होती. तसेच मुंबईतील चुनाभट्टी भागातील रहिवासी संजय कदम यांच्या तक्रारीवरून निर्मल नगर पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सांगण्यात येते.
विशेष म्हणजे वांद्रे न्यायालय परिसरातील एका छोट्या कार्यालयात हा गैरप्रकार सुरू असल्याचे उघड झाले असून तेथे नोटरीचे काम सुरू होते. मात्र हे काम समोर कोणताही शिवसैनिक किंवा व्यक्ती उपस्थित नसतानाही अशा प्रकारे गुपचुपपणे प्रतिज्ञापत्रावर सही व शिक्के मारण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कदम यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली असता तेथील व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणात शपथपत्र असल्याचे आढळून आले, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. दरम्यान, संबंधिताला पोलिसांनी या शपथपत्रांबद्दल विचारले असता त्याच्या कडून कोणतेही योग्य उत्तर मिळाले नाही, अखेर याप्रकरणी पोलिसांनी त्या नोटरी करणाऱ्या व्यक्तींकडून सर्व शपथपत्र जप्त केली. याला आधारकार्डाची झेरॉक्स प्रत व फोटो चिकटवून ही बनावट शपथपत्र तयार झाली असल्याची सांगण्यात येते आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून माहिम व अंधेरी येथेही कारवाई करण्यात आली आहे.
आता क्राईम ब्रांच पोलिस सदर शपथपत्रासोबत असलेल्या आधारकार्ड आणि शिवसैनिकांचा फोटो बघून, संबंधित सर्वांना बोलवून पडताळणी करणार असून ही शपथपत्र त्यांच्या संमतीनेच घेतली गेली आहेत का ? याची चौकशी केली जाणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सदस्यांनी पक्षाच्या नोंदणीबाबत बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि पक्षाचे चिन्ह आपल्याकडे ठेवण्यासाठी ही बनावट शपथपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केल्याचा संशय आहे. आधीच शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठविण्यात आल्याने दोन्ही गटांना धक्का बसला असताना आता पुन्हा हे बनावट शपथपत्राचे प्रकरण उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
Shivsena Fake Affidavit Police Investigation