नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणू आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाकडे दिले आहे. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज सकाळीच यासंदर्भात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नाकारले आहे. या याचिकेवर उद्या म्हणजेच बुधवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी ३.३० वाजता कामकाज करण्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आजपासून सलग तीन दिवस नियमित सुनावणी होत आहे. याच सुनावणीत निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेची सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले होते. आज न्यायालयाचे कामकाज सुरू होताच ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आणि विनंती केली की, निवडणूक आयोगाचा निर्णय हा पक्षपाती आहे. त्यास तातडीने स्थगिती द्यावी. कारण, पक्ष निधी आणि बँक अकाऊंट यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र, न्यायालयाने लगेचच यावर सुनावणी घेण्यास नकार दिला. यासंदर्भात उद्या दुपारी ३.३० वाजता आपण हे प्रकरण पाहू, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रश्नी उद्या न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची याचिका उद्या दुपारी 3.30 वाजता ऐकणार सुप्रीम कोर्ट
दरम्यानच्या काळात घटनापीठाचे कामकाज मात्र सुरू राहणार
आयोगाविरोधात याचिका कोर्टाने ऐकू नये, त्यांना हायकोर्टानेही दोन वेळा नाकारले शिंदे गटाचा दावा
उद्या कळेल स्थगिती मिळणार की नाही?
— Prashant Kadam (@_prashantkadam) February 21, 2023
Shivsena Election Commission Decision Supreme Court Hearing