मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशासाठी उद्या दसऱ्याचा सण असला तरी शिवसेनेच्या दोन गटांसाठी मात्र ताकद दाखविण्याची पर्वणीच आहे. अधिकाधिक शिवसैनिकांना आपल्या गोटात आणण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. दसरा मेळाव्याचे मोठे निमित्त ठरणार आहे, जिथे जास्तीत जास्त गर्दी जमवण्याचा प्रयत्न दोन्ही गट करत आहेत. या मेळाव्याची तयारी एवढ्या जोरात सुरू आहे की, १० हजार वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत पोहोचणार आहेत. यामध्ये ६ हजार सरकारी आणि खासगी बसेसचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ३ हजार कारमधून कार्यकर्ते मेळाव्यात पोहोचतील.
शिवसेनेच्या सुमारे ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षात एवढी मोठी फूट पडली आहे. तसेच, वेगवेगळ्या गटांनी दसरा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी गर्दी जमवण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सभेला कार्यकर्त्यांना आणण्यासाठी शिंदे गटाने सुमारे १८०० सरकारी बसेस बुक केल्या आहेत. यासाठी १० कोटी रुपये रोख देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. ३ हजार खाजगी कारचे बुकिंग आधीच झाले आहे. वांद्रे कुर्ला संकुलात एकनाथ शिंदे गटाचा मेळावा होत आहे. यात एक ते दीड लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1577247685580492800?s=20&t=8vLUzOwAnpSrOnL8_mdIjQ
उद्धव गटाकडून १४०० खासगी बसेस बुक
गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्या-तालुक्यात दौरे करत आहेत. शिंदे गटाच्या वतीने मुंबईत येणाऱ्या शिवसैनिकांची राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था करण्यात येत आहे. शिंदे गटाकडून बसेसच्या बुकिंगवर १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर, उद्धव ठाकरे गटाकडून १४०० खासगी बसेस बुक करण्यात आल्या आहेत. शिवसेना शाखाप्रमुख, मुंबई महानगर प्रदेशातील नगरसेवकांना स्वखर्चाने कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कसारा, कर्जत, खोपोली, पालघर, विरार, डहाणू रोड येथून मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, सात आसनी कार अशा वाहनांची संख्याही हजारोंच्या घरात असेल.
१० कोटींच्या रोख व्यवहारावर प्रश्न, ईडीकडून चौकशीची मागणी
राज्यातील खासगी बस चालक-मालकांच्या म्हणण्यानुसार दोन्ही गटातील कार्यकर्ते एकूण दहा हजार वाहनांतून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी सरकारी बस बुक करण्यासाठी १० कोटी रुपये रोख दिले आहेत. त्यावर विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत की ही रक्कम शिवसेना पक्षाच्या खात्यातून देण्यात आली आहे का? नसेल तर ही रक्कम आली कुठून? १० कोटींचा रोख व्यवहार कसा झाला? ईडी आणि आयटीने याची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
https://twitter.com/ShivSena/status/1576815087322480640?s=20&t=8vLUzOwAnpSrOnL8_mdIjQ
१० हजार वाहने कुठे उभी राहणार?
एसटी महामंडळाकडून बसचे २४ तासांचे किमान भाडे १२ हजार रुपये घेतले जाते. २४ तासांनंतर प्रति किलोमीटर ५६ रुपये आकारले जातात. वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदानात प्रत्येकी १ हजार वाहने आणि सोमय्या मैदानात ७०० ते ९०० वाहने उभी करण्याची योजना असल्याचे बोलले जात आहे. दसऱ्याची सुट्टी असल्याने त्या दिवशी मुंबईत कर्मचाऱ्यांच्या नियमित वाहनांची संख्या कमी असेल. पार्किंगची जागा संपल्यानंतर शिवसैनिकांनी आपली वाहने पूर्व-पश्चिम महामार्गावर सर्व्हिस रोडलगत इतर वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पार्क करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.
Shivsena Dasar Melava 10 Thousand Vehicles 10 Crore Amount
Politics