मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा दसरा मेळाव्यावर काहीसे राजकारणाचे आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली की, परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. मुंबई महापालिकेने अद्याप मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. गेल्या अनेक दशकांपासून शिवसेना ही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचे आयोजन करत आली आहे. त्यामुळए यंदा काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आजही मराठी माणसं लक्षात ठेवतात यामागे अनेक कारणं आहेत. या पहिल्या मेळाव्यात मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणा-या शिवसेनेने आपली भुमिका अधिक स्पष्ट केली होती. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत मराठी माणसाला ८० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत आणि मराठी लिहिता-वाचता किंवा चांगले मराठी बोलता येते अशा व्यक्तीलाच राज्य सरकारने सरकारी नोकऱ्या द्याव्यात अशी बाळासाहेबांनी मागणी केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यात, घराघरात शिवसेनेचे कार्यकर्ते घडू लागले.
बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या नोकऱ्यांसाठी पाठपुरावा सुरुच ठेवला. शिवसेना पक्षाचं शक्तीप्रदर्शन आणि यानिमित्ताने महाराष्ट्रातील नागरिकांशी खुला संवाद व्हावा याउद्देशाने बाळासाहेबांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. तो दिवस होता ३० ऑक्टोबर १९६६ चा! काहीही झालं तरी पहिला मेळावा दणक्यात व्हायला हवा, या एकाच विचाराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तडक शाहीर साबळेंना बोलावणं धाडलं. शाहिरांच्या खड्या आवाजात ‘महाराष्ट्र गीत’ सुरु झालं आणि पाहता पाहता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांची पावलं पार्काकडे वळली. अशारितीने शिवसेनेचा पहिला मेळावा, ज्याला गर्दी होईल का? हा प्रयत्न यशस्वी होईल का? अशी शंका बाळासाहेबांना वाटत होती, त्या मेळाव्याने राजकीय इतिहासात एक नवी परंपरा सुरु केली.
बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी दरवर्षी दसरा मेळाव्याची परंपरा जपली. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना विभागली आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. यावर्षी पाच ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. शनिवारी आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी देण्यात येत असलेले अर्थ महापालिका अधिकारी स्वीकार करत नाहीत. दरम्यान सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, दसरा मेळाव्यासाठी राज्यातील काना-कोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर येण्याच्या तयारीत आहेत. उद्धव म्हणाले की, शिवसेनेचा वार्षिक मेळावा शिवतीर्थ (शिवाजी पार्क) वरच होईल.
१९९७ ते मार्च २०२२ पर्यंत मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. मात्र मुदतीत निवडणुका न झाल्यानं सध्या मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. त्यानंतर जून महिन्यात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतील बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर शिवसेनेतील दोन गटांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर राज्यातील शिवप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजते. त्यामुळे आता विचारांचे सोने लुटण्याची संधी शिवसेनेला मिळणार, की एकनाथ शिंदे गटाला याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे असतानाच आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळावादेखील कोर्टात जाण्याची शक्यता आहे. कारण मेळाव्यास मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली तर उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने याच ठिकाणी मेळावा घेण्याची भूमिका घेतल्याने मेळावा नेमका कोणाचा होणार, ही अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांनी सांगितले की, मुंबई महापालिका आम्हालाच परवानगी देईल, असा आमचा विश्वास आहे. परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.
काही वर्षांपूर्वी शिवाजी पार्कला सायलेन्स झोन म्हणून जाहीर केल्यानंतर शिवसेनेचा मेळावा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तथापि, हा केवळ मेळावा नाही तर पारंपरिक उत्सव असल्याचे मत देत उच्च न्यायालयाने मेळाव्याला परवानगी दिली होती. याची आठवण परब यांनी करून दिली. महापालिकेने परवानगी नाकारली तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा पर्याय आमच्यासमोर असेल. शिंदे गटाने शिवाजी पार्कवर मेळावा आपणच घेणार, अशी भूमिका घेत तयारी चालविली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाचे काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी शनिवारी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘मेळावा आपणच घेणार का,’ असा प्रश्न शिंदे यांना ठाण्यात विचारला असता ते म्हणाले की, अजून वेळ आहे. आता गणेशोत्सव, मग नवरात्र आहे, नंतर बघू. मात्र लगेच निर्णय घेण्याऐवजी ठाकरे गटाला दबावात ठेवण्याची शिंदे गटाकडून खेळली जात असल्याचे समजते.
उद्धव ठाकरे यांच्या वतीने परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज देण्यात आला आहे. पण त्यावर निर्णय काय घ्यायचा, यावरुन संभ्रमावस्था असल्याचं बोलले जात आहे. मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक कामकाज पाहत आहेत. त्यामुळे एका अर्थाने पालिकेवर सध्या शिंदे-फडणवीस सरकारचेच राज्य असल्यासारखे आहे. याअर्थी शिंदे गटाला परवानगी मिळेल, अशी चर्चा आहे. पण अद्याप तसा कोणताही निर्णय झालेला नाही. सत्ता ज्यांच्याकडे असते, त्यांना परवानगी मिळवणे फार कठीण होत नाही, अशा आशयाचे विधान अजित पवार यांनी केले आहे.दुसरीकडे महापालिकेनं जर परवानगी नाकारली, तर दसरा मेळावा घेण्याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आमच्याकडे आहे, असे ठाकरे गटाच्यावतीन सांगण्यात आले आहे.
Shivsena Chief Uddhav Thackeray Dasara Melava
Politics Rebel Shinge Group Eknath Shinde Shivaji Park BMC









