मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्हीही शिंदे गटाकडे असल्याचा निर्णय दिल्यानंतर ठाकरे आणि शिंदे आमने सामने उभे ठाकले आहेत. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने शिवगर्जना आणि शिवसंवाद यात्रेची घोषणा केली. तर शिंदे गटाने अर्थात शिवसेनेने शिवधनुष्य यात्रेच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आपल्या सोबत आहे हे सिद्ध करण्यासाठी ठाकरे गटाने शिवगर्जना आणि शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. २५ फेब्रुवारीपासून ही यात्रा सुरू झाली असून ३ मार्चला त्याचा समारोप होणार आहे. त्यासाठी सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याचे काम करीत आहे. जनतेसोबतच सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे. पक्षातून सातत्याने लोक सोडून जात असताना संघटन मजबुत करण्यासाठी आणि पक्षाची गळती थांबविण्यासाठी प्रयत्न होणार आहे.
या नेत्यांवर जबाबदारी
शिवगर्जना आणि शिवसंवाद यात्रेची जबाबदारी सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, प्रियांका चतुर्वेदी, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, नितीन बालगुडे यांच्यासह विविध नेत्यांवर तसेच पदाधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांनी यात्रेची जबाबदारी सोपवली आहे.
शिंदेंचे अभियान अयोध्येतून
शिंदे गटाने अर्थात शिवसेनेने ठाकरे गटाच्या यात्रेला प्रत्युत्तर म्हणून शिवधनुष्य यात्रेची घोषणा केली आहे. या यात्रेची सुरुवात मार्च अखेरीस अयोध्येतून होणार आहे. अयोध्येतील महंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देतील आणि त्यानंतर हे धनुष्यबाण घेऊन सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतील.
महाराष्ट्राचा स्वाभिमान…
शिवसेनेने शिवधनुष्य यात्रेसाठी एक घोषवाक्यही तयार केले आहे. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान माझा धनुष्यबाण’ असे हे घोषवाक्य आहे. संपूर्ण यात्रेत हाच नारा दिला जाणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या यात्रेची जय्यत तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
Shivsena Aggressive Planning Against Uddhav Thackeray