मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत जोडो यात्रेमध्ये हिंगोलीतील सभेत बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद सुरू आहे. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. काँग्रेसच्या विरोधात त्यांनी ब्रिटिशांना मदत केली होती. तसेच, त्यांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली होती, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यात भाजप, शिंदे गट आणि मनसेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.
आपल्या पक्षाला सावरकरांबद्दल नितांत आदर असून, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे आपण समर्थन करत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यवर आदित्य ठाकरेंनी देखील भूमिका मांडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आमच्या मनात प्रचंड आदर व प्रेमाची भावना होती. राहुल गांधींच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आणखी सांगितले की, भाजपने याबाबत राजकारण करू नये. सावरकरांना केंद्र सरकारने अद्याप भारतरत्न का दिला नाही? असा टोला देखील लगावला. सध्या महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरू असून यात भाजप आणि मित्र पक्ष सोडून सर्वच पक्षीय नेते सहभागी होत आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेही राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते. सहाजिकच भाजपाकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले जात होते. यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.
या सर्व वादावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता आदित्य ठाकरेंनी आजच्या स्थितीवरही भाष्य करण्याचे आवाहन राजकीय पक्षांना केले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी याबाबतीत भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांच्या भूमिकेशी मीही सहमत आहे. पण सध्याच्या स्थितीसाठीही राष्ट्रीय पक्षांनी भांडायला पाहिजे, असेही ते म्हणाले. आपण सगळे ५० वर्षांपूर्वी किंवा १०० वर्षांपूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होते, यावर भांडायला लागलो, तर भविष्यासाठी कोण भांडणार आणि आत्ताच्या स्थितीसाठी कोण भांडणार? असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे यांची पत्रकार परिषद | शिवसेना भवन – LIVE https://t.co/0DG9ZnueOa
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 18, 2022
Shivsena Aditya Thackeray on Rahul Gandhi Statement
Politics Svatantryavir Savarkar