नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोनवर्षांपासून शिवसेनेची कार्यकारिणी बदलणार अशा अफवा आणि बातम्या पेरण्याचे काम काही विरोधक करत आहेत. मात्र, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत शिवसैनिक म्हणून समाजकार्य आणि पक्ष कार्य करत राहू. खोट्या बातम्या पेरुन शिवसेनेची बदनामी करणारा पक्षातील कोणी असेल तर त्याची माहिती द्यावी, त्याची आम्ही वरिष्ठ पातळीवर तक्रार करू असे निवेदन नाशिक शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, कॉमन मॅनसाठी काम करणारा असामान्य मुख्यमंत्री अशी प्रतिमा जनमाणसांत निर्माण करणाऱ्या शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष वाढीचे काम नाशिक शहरात सुरु आहे. शिवसेनेने मला गट प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपमहानगर प्रमुख, विधानसभा प्रमुख अशी पदोन्नती देत महानगरप्रमुख पदापर्यंत पक्षकार्याची संधी दिली आहे. मंत्री दादासाहेब भुसे, खा. हेमंत गोडसे यांच्या नंतर नाशिक शहरातून मी प्रथम एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले आणि महानगर प्रमुख म्हणून कार्यरत झालो. उबाठा गटाच्या अनेक नेत्यांनी आमच्यावर गरळ ओकली पण आम्ही पक्ष कार्य आणि पक्ष बांधणी सुरु ठेवली. मी बिनधास्तपणे संपूर्ण शहरात एकटा फिरत होतो, मी आणि शिवसैनिक कोणताही सुरक्षा रक्षक घेऊन फिरले नाही.
त्यावेळी, नाशिक मध्ये मंत्री दादासाहेब भुसे, प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे आणि संजय मशीलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिला भव्य मेळावा घेऊन उबाठा गटाचा आवाज मी आणि शिवसैनिकांनी बंद केला होता. महानगर प्रमुख म्हणून पक्षाची बांधणी करणे, पक्षात समाजसेवकांना आणणे हे प्रमुख कर्तव्य आहेच. लोकसभा आणि विधानसभा निवडूणुकीत शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मंत्र आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शिकवण मूळ शिवसैनिक कधीच विसरु शकत नाही.
शिवसैनिक हा संघर्ष करत समाजासाठी लढणारा असतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणारा कधीच नसतो. शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे यांनीही आम्हाला सतत हीच शिकवण दिली आहे. दोनवर्षांपासून शिवसेनेची कार्यकारिणी बदलणार अश्या अफवा आणि बातम्या पेरण्याचे काम काही विरोधक करत आहेत. मात्र, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत शिवसैनिक म्हणून समाजकार्य आणि पक्ष कार्य करत राहू. खोट्या बातम्या पेरुन शिवसेनेची बदनामी करणारा पक्षातील कोणी असेल तर त्याची माहिती पत्रकारांनी द्यावी, त्याची आम्ही वरिष्ठ पातळीवर तक्रार करू असे म्हटले आहे.