इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आज नागपूरला भेट देणार असून, विकसित कृषी
या विषयावर होणाऱ्या उच्चस्तरीय हितधारकांच्या सल्लामसलत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. यासोबतच ते नागपूरमध्ये राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कृषी आणि ग्रामीण विकास योजनांचा आढावा घेणार आहेत.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लायब्ररी
(एनएसएसएल)चे उद्घाटन करतील. डिजिटल कृषी क्षेत्रातील हा एक महत्त्वपूर्ण पुढाकार असून, हे ग्रंथालय आयसीएआर – राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन विभाग, नागपूर, भारतीय मृदा विज्ञान संस्था, भोपाळ आणि भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली
यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आले आहे. हा उपक्रम सूक्ष्म शेती उपक्रमाचा भाग आहे. या कार्यक्रमात गुलाबी बोंड अळी या कापसावरील प्रमुख कीटकाचा सामना करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित स्मार्ट सापळ्याचे लोकार्पणही चौहान करतील. ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित सापळा प्रणाली आयसीएआर – राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन विभाग, नागपूरने विकसित केली आहे आणि यात अचूक कीड नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्राधारित शिक्षण (मशीन लर्निंग) वापरले जाते.
कार्यक्रमात या भागातील प्रगतीशील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लायब्ररी
ची स्थापना ही भारताच्या डिजिटल कृषी क्षेत्रातील वाटचालीतील एक मैलाचा दगड मानली जात आहे. पारंपरिक रासायनिक चाचणीच्या ऐवजी, हे ग्रंथालय मातीच्या विश्लेषणासाठी स्पर्शरहित, जलद आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणार आहे. विविध कृषी जैवभौगोलिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे मातीचे वर्णपट माहिती संच यावेळी राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहेत.
या दौऱ्यात चौहान यांच्यासोबत डीएआरईचे सचिव व आयसीएआरचे महासंचालक डॉ. मांगी लाल जाट, आयसीएआरचे उपमहासंचालक, सहाय्यक महासंचालक, महाराष्ट्रातील आयसीएआर संस्थांचे संचालक, राज्य कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.