मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण’ असे घोषवाक्य करुन शिंदे गटातर्फे राज्यात लवकरच शिवधनुष्य यात्रा सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाने राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान २५ फेब्रुवारी पासून सुरु केले आहे. हे अभियान ३ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर शिवधनुष्य यात्रा सुरु होणार आहे. पण, या यात्रेची तारीख अद्याप ठरलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे अगोदरच निश्चित झाले आहे. या अयोध्या दौऱ्याची सुध्दा जोरदार तयारी सुरु आहे. या दौ-यात सर्व मंत्री आणि आमदार सहभागी होणार आहेत. या अयोध्या भेटीत महंत धनुष्यबाण भेट देणार आहेत. हे धनुष्यबाण शिंदे गटाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरवले जाणार आहे. निवडणुक आय़ोगाच्या निकालानंतर शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळाली. त्याचबरोबर धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले. त्यानंतर हे धनुष्यबाण आमच्याकडे असल्याचे बिंबवण्यासाठी व शिवसेनेची वातावरण निर्मिती करण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे. यात मोठे शक्तीप्रदर्शन सुध्दा केले जाणार आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा निकालही लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालानंतर ही यात्रा काढली जाऊ शकते असेही बोलले जात आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या शिवगर्जना अभियानाला या यात्रेतून उत्तर दिले जाणार आहे.