शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा यांच्या दर्शनासाठी शिर्डीत केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील देखील दरवर्षी लाखो भाविक येतात. तसेच दक्षिणा व दान रूपात दानपेटी मध्ये कोट्यावधी रुपये तसेच सोने-चांदी जमा होते. परंतु यामध्ये नाण्यांची संख्या प्रचंड असते. परंतु या नाण्यांचे आता काय करावे असा मोठा प्रश्न संस्थानच्या पदाधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. कारण ही नाणी घेण्यास शिर्डी मधील सर्वच बँक टाळाटाळ करत आहेत. कारण ही नाणी कुठे ठेवावीत, असा प्रश्न देखील बँकांपुढे आहे.
ग्राहकांना देखील एवढी नाही देणे शक्य नसते, त्यामध्ये खूप वेळ जातो, असे बँकांच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. शिर्डीतील साईबाबा यांच्या चरणी यंदा रामनवमीला तीन दिवसांत तब्बल चार कोटींचे दान अर्पण करण्यात आले आहे. दक्षिणा पेटीत १ कोटी, देणगी काउंटरवर ७६ लाख, १७१ ग्रॅम सोने आणि या व्यतिरिक्त २ किलो चांदी सुद्धा साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.
साईभक्त व भाविक यथाशक्ती दान देत असतात. यात सोने, चांदी तसेच रोख रकमेचे दानही प्राप्त होते, मात्र आता हेच दान संस्थान आणि शिर्डीतील बँकाची डोकेदुखी ठरत आहे.
वर्षाकाठी संस्थानला साडेतीन कोटी रुपयांची नाणी प्राप्त होतात आणि ही नाणी स्वीकारण्यास बँका असमर्थतता दर्शवत आहेत. शिर्डीमध्ये दर्शनाला दररोज हजारो भाविक येतात आणि आपल्या इच्छेनुसार दानही करतात. या दानामध्ये दानपेटीत येणाऱ्या सुट्या नाण्यांचा मोठा समावेश असतो. साईसंस्थानच्या दानपेटीतील नाण्यांमुळे बँका त्रस्त झाल्या आहेत.
साईबाबांच्या दानपेटीत दर आठवठ्याला सरासरी सात लाख तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी जमा होतात. मात्र आता ही नाणी स्वीकारणे बॅंकांना अवघड होऊन बसलंय. शिर्डीतील १२ हून अधिक तर नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत साईसंस्थाचे खाते आहे. प्रत्येक बँकेकडे दीड ते दोन कोटींची नाणी आजमितीला पडून असून नाण्यांच्या डोकेदुखीमुळे चार बँकांनी यापुढे संस्थानच्या ठेवी स्वीकारण्यास असमर्थता दाखवली आहे.
दरम्यान, दानपेटीत येणाऱ्या नाण्यांमुळे साई संस्थानपुढे तसेच बँकापुढे देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिर्डी शहराव्यतिरिक्त जिल्ह्यातील व अन्य जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाते उघडण्याचा विचार संस्थानकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. यातून मार्ग निघावा यासाठी थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करणार असल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटले आहे.
Shirdi Sai Baba Temple Trust Donation Headache