मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आमदार-खासदारांच्या सुरक्षेसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्षातील केवळ ६० आमदार आणि १२ खासदारांनाच ही खास ‘सोय’ करून देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनात या विषयाकडे सर्वांचं लक्ष वेधलं. मुंडे यांनी विधानसभेतील भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या भाषणाचा व्हिडियो ट्वीट करत सत्ताधारी पक्षाच्या मनमानीवर टिका केली आहे. सत्ताधारी पक्षातील ६० आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला १४४ कोटी रुपये खर्च होत आहेत. तर १२ सत्ताधारी खासदारांच्या सुरक्षेवर दर महिन्याला अडिच कोटी आणि वर्षाला ३० कोटी रुपये खर्च होत आहेत. हे सर्व १२ खासदार संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे आहेत, हे विशेष. साठ आमदार आणि १२ खासदार अश्या ७२ लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी वर्षाला जवळपास १७५ कोटी रुपये खर्च होत आहेत. या सर्वांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली जात आहे.
आता गंमत ही आहे की, बहुमतावर सत्तेत असलेल्या पक्षाने केवळ ७२ आमदार-खासदारांनाच ही खास सुरक्षा का दिली आहे? कोण आहेत हे ७२ लोक? आणि आमदार-खासदारांना केवळ एक सुरक्षा रक्षक सोबत ठेवण्याची परवानगी दिली असताना, वाय सुरक्षेचा बडेजाव का केला जात आहे? असे अनेक प्रश्न धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील भाषणामुळे निर्माण झाले आहेत. जनतेच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, अशा घोषणा देणाऱ्या आमदार-खासदारांनाच कोट्यवधी रुपयांची सुरक्षा लागते, याची आता चर्चा होऊ लागली आहे.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1609530010385387526?s=20&t=rP9WmrOfYrlFlcpCqdpsYg
Shinde Group MLA and MP Security Expenses