मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांना दिलासा मिळाला आहे. ठाकरे सरकारने केलेले त्यांचे निलंबन विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. सरकारने यासंदर्भातील आदेश आज काढले आहेत.
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. यानंतर परमबीर सिंह यांना निलंबित करण्यात आले होते. परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर आता परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.
२ डिसेंबर २०२१ रोजीचे आरोपपत्र अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९६९ च्या नियम ८ अंतर्गत परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले जात आहे. हे प्रकरण बंद केले जात आहे, असे सरकारचे संयुक्त सचिव व्यंकटेश भट यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. याशिवाय, नियमांच्या तरतुदींनुसार, परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द करण्यात येत असून, ०२ डिसेंबर २०२१ ते ३० जून २०२२ पर्यंतच्या निलंबनाचा कालावधी सर्व उद्देशांसाठी कर्तव्यावर असल्याचे मानले जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. याचाच अर्थ सदर काळ सेवा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.
नागपूरशी नाते, मविआला आणले होते अडचणीत
परमबीर सिंह यांचे नागपूरशी जवळचे नाते आहेत. ते माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपूत्र सागर मेघे यांचे व्याही आहेत. दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करून महाविकास आघाडीला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अडचणीत आणले होते. अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना परमबीर सिंह यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अनेक महिने ते अज्ञातवासात होते.
Shinde Fadnavis Government IPS Parambir Singh Order