मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आणि आशियातील सर्वात मोठा श्रीमंत गौतम अदानी यांच्या कंपनीने सरकारी मालकीच्या वीज कंपन्या JSW, पॉवर ग्रिड आणि ओएनजीसी यांना एका झटक्यात मागे टाकले आहे. मार्केट कॅपनुसार अदानी पॉवर देशातील ३१ वी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. कोरोना महामारीनंतर शेअर बाजारात काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यात अदानी ग्रुपच्या, अदानी पॉवर, अदानी एंटरप्रायजेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रीन एनर्जी, या सर्वच्या सर्व सहा शेअर्सचा समावेश आहे.
अदानी ग्रुपच्या या सर्वच्या सर्व सहा शेयर्सनी गेल्या दोन वर्षांत आपल्या शेअरधारकांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. जर एखाद्या शेयरधारकाने दोन वर्षांपूर्वी या सहा मल्टीबॅगर शेअर्समध्ये प्रत्येकी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्यांचे तब्बल 66 लाख रुपये झाले असते.
अदानी पॉवर
अदानी समूहाचा हा शेअर एनएसईवर 21 ऑगस्ट 2020 रोजी 39.15 रुपयांवर बंद झाला होता. आता अदानी पॉवरच्या शेअरची किंमत 410.65 रुपये आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांत अदानी पॉवरच्या शेअरची किंमत जवळपास 10.50 पट वाढली आहे. त्यामुळे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी अदानी पॉवरच्या मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर, त्याच्या 1 लाखाचे आज 10.50 लाख रुपये झाले असते
अदानी एंटरप्रायजेस
या मल्टीबॅगर स्टॉकचा शेअर 21 ऑगस्ट 2020 रोजी NSE वर 233.35 रुपयांच्या पातळीवर होता, तर आता या शेअरची किंमत 3,127 रुपये एवढी झाली आहे. म्हणजेच गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाच्या या शेअरने 13.40 पट एवढा परतावा दिला आहे. अर्थात, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज 1 लाख रुपयांचे 13.40 लाख रुपये झाले असते.
अदानी ग्रीन एनर्जी
अदानी ग्रुपचा हा शेअर 21 ऑगस्ट 2020 रोजी 376.55 रुपयांवर बंद झाला होता. आता अदानी ग्रीनच्या शेअरची किंमत 2,422 रुपये एवढी आहे. अर्थात या स्टॉकने गेल्या दोन वर्षांत 6.45 पट एवढा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 6.45 लाख रुपये झाले असते.
अदानी ट्रान्समिशन
अदानी ग्रुपच्या या कंपनीचा शेअर 21 ऑगस्ट 2020 रोजी एनएसईवर 272.10 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरची किंमत 3,612 रुपयांवर आहे. गेल्या दोन वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक 13.25 पटींनी वाढला आहे. जर गेल्या दोन वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 13.25 लाख रुपये झाले असते.
अदानी टोटल गॅस
अदानी समूहाच्या या कंपनीचा शेअर बीएसईवर 21 ऑगस्ट 2020 रोजी 165.55 रुपयांवर होता. आता याची किंमत 3,380.80 रुपयांवर गेली आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांत या शेअरने 20.40 पट नफा दिला आहे. यामुळे, एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या दोन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्याच्या 1 लाख रुपयांचे आता तब्बल 20.40 लाख रुपये झाले असतील.
अदानी पोर्ट्स
अदानी समूहाच्या या शेअरची किंमत गेल्या दोन वर्षांत 354.35 रुपयांवरून 870 रुपयांवर पोहोचली आहे. हा शेअर साधारणपणे 2.50 पट वधारला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर अदानी स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 2.50 लाख रुपये झाले असते.
एखाद्या गुंतवणूकदाराने अदानी समूहाच्या या कंपन्यांमध्ये प्रत्येकी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर या मल्टीबॅगर अदानी शेयर्समध्ये त्यांची शुद्ध संपत्ती जवळपास 66.50 लाख रुपये (10.50 लाख + 13.40 लाख + 6.45 लाख + 13.25 लाख + 20.40 लाख + 2.50 लाख) एवढी झाली असती, हे मात्र निश्चित सांगता येईल.
विशेष म्हणजे शेअर बाजारात घसरण होऊनही अदानी समूहाच्या बहुतांश शेअर्समध्ये तेजी कायम आहे. त्यामुळे ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांची नेट वर्थ रॉकेट वेगाने वाढत आहे. आता ते १३७ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत इलॉन मस्क, जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्यानंतर अदानी चौथ्या क्रमांकावर आहे. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती ६०.२ अब्ज डॉलरने वाढली आहे. त्याच्याशिवाय टॉप १० मधील सर्व श्रीमंतांच्या संपत्तीत यावर्षी घट झाली आहे.
(महत्त्वाची सूचना- शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे अतिशय जोखमीचे आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा)
Share Market Investment Money Return
Adani Industry Power Ports Total Gas Transmission Enterprises Energy