मोदी-ठाकरे भेटीसह महत्त्वाच्या बाबींवर शरद पवार म्हणाले की….

विशेष प्रतिनिधी, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट दिल्लीत झाली, महाराष्ट्रात सत्तारुढ महाविकास आघाडी सरकारचे कामकाज कसे आहे, मुख्यमंत्री ठाकरे यांचे नेतृत्व कसे आहे, यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते.
पवार म्हणाले की, 
– नुसतं पाच वर्षेच नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करून सामान्य जनतेत प्रभावीपणे देश व राज्यात प्रतिनिधीत्व करण्याचं हे सरकार काम करेल याबाबत माझ्या मनात शंका नाही.
– तिन्ही पक्षाच्या लोकांनी या पर्यायाच्या बांधीलकीतून योग्य रीतीने पावलं टाकायला सुरुवात केली. आणि परिणामस्वरूप हे आघाडी सरकार उत्तम रीतीने काम करतंय… कुणी काहीही म्हणो, हे सरकार टिकेल आणि पाच वर्षे काम करेल.
– आपण २२ वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि संघर्षाची भूमिका स्वीकारली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या २२ वर्षांचा आढावा आपण घेतोय.
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे वैशिष्ट्य राहिले की तुमच्या साऱ्यांच्या कष्टाने आणि जनतेच्या बांधीलकीने आज आपण २२ वर्षे आणि दिवसेंदिवस जनमानसात आपली शक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादित करण्यात यशस्वी झालो.
– कोरोना संकटात देशाचं एकंदरित चित्र पाहिलं तर अधिक गंभीर स्थिती महाराष्ट्रात होती. तिचा सामना करण्यासाठी व लोकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी आरोग्य खात्याने राजेश टोपेंच्या नेतृत्वात जे काम केले त्यातून आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो, हा विश्वास सामान्य लोकांमध्ये तयार झाला.
– यापुढे महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची कुवत असलेली एक पिढी आज राष्ट्रवादीमधून तयार होत आहे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आपण केले पाहिजे. या नेतृत्वाच्या फळीमागे सामान्य माणूस विश्वासाने उभा राहून त्यांची बांधिलकी कायम टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
– आज एका वेगळ्या विचारांचं सरकार आपण स्थापन केलं आहे. कधी कुणाला पटलं नसतं की सेना आणि आपण एकत्र काम करू शकू. पण आपण ते केलं. पर्याय दिला आणि सुदैवाने तो पर्याय लोकांनी स्वीकारला.
– महाविकास आघाडी सरकारचे काम उत्तम चालू आहे. ते यापुढेही चालू राहिल
– कुणी काहीही चर्चा करीत असले तरी त्याची पर्वा करु नका. आपण आपले काम नेटाने करा. सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत रहा.
– राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटले. त्यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दोन्ही नेते स्वतंत्र भेटले, बसले. काही चर्चा विनिमय केला. कुणी काही करो, पण लगेच वेगवेगळ्या प्रकारच्या शंका, वावड्या उठवल्या जातात. कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेना विश्वास असणारा पक्ष आहे. शिवसेना त्यांची भूमिका सोडणार नाही. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल