सुदर्शन सारडा
नाशिक:विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे वारे वेगाने वाहत असताना आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनी भोवती आवाज करायला सुरवात केली.अशातच मंगळवारी ग्रीन बेल्ट असलेल्या दिंडोरी, निफाड मध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभा विशेष चर्चेत राहिल्या. नरहरी झिरवाळ यांनी फसवल्याचे सांगून सुनीता चारोस्कर यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन पवारांनी केले. यामुळे झिरवाळ यांच्या कुंडलीत कडक मंगळ प्रवेश करू पाहत आहे. तर दुसरीकडे दिलीप बनकर यांच्या राजकीय कुंडलीत कोणता ग्रह प्रवेश करणार याकडे समस्त मतदारांचे लक्ष लागले असताना पवारांनी मात्र बनकर यांच्या विरोधात एकही अवाक्षर न काढल्याने बनकर यांच्या राजकीय कुंडलीत रवी आणि शुक्र ग्रह समान संधीत असल्याचे सूतोवाच तर केले नाही ना? की अजून नेमका काय हेतू साधला यावर सोशल मीडियावर चर्चा झडू लागल्या आहे.
राजकीय कुंडलीत पंधरा वर्षांनी झिरवाळ यांचा मंगळ,राहू आणि केतू हे रेषेत नसल्याने सुनीता चारोस्कर यांच्या नावाला मोहोर उमटवा असे आवाहन पवार यांनी केले.झिरवाळ हे दोनवेळा पळून गेले,इतकं देऊनही आणि एवढं मोठ करूनही झिरवाळ माझे झाले नाही तर तुमचे कसे होतील असा थेट हल्ला केला.दिंडोरी येथील सभा आटोपल्यानंतर पवार यांचे हेलिकॉप्टर त्यांच्याच नावाच्या बाजारसमितीच्या बांधा शेजारी उतरले.कदाचित हवेतून त्यांनी त्यांच्या नावाचा बाजार आवार बघितला असणार त्यामुळेच त्यांनी दिलीप बनकर यांच्या विरोधात बोलणे टाळले की आणखी काय बौद्धिक गनिमीपणा वापरला हे अस्पष्ट असले तरी निफाड तालुक्यात मात्र काका प्रेमींनी स्टेटस ठेवत ‘साहेबांच्या मनात काका सदैव’ असा कयास बांधल्याने येणाऱ्या वीस तारखेपर्यंत निफाडच्या रणसंग्रामात आणखी काय घडामोडी घडतात हे बघणे महत्वाचे ठरेल.
दिलीप बनकर आणि शरद पवार हे ऋणानुबंध गत तेवीस वर्ष सातत्याने असताना शरद पवार माझे दैवतच आहे असे बनकर राजरोस सांगत असतात केवळ तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मी महायुती बरोबर गेलो.माझ्या या निर्णयामुळे मतदारसंघात भरघोस निधी आला त्यामुळे पंधरा वर्षांचा अनुशेष भरून काढण्यात मदत झाली.मी आमदार नव्हतो तेव्हा पासून पवार साहेब माझे दैवत असल्याने मी आजही त्यांना मानतो.
माझी उमेदवारी जरी युतीकडून असली तरी पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम असल्याचे बनकर यांनी सांगितले. दुसरीकडे अनिल कदम यांनी दोन तीन मुद्द्यांच्या आधारे बनकर यांच्यावर तोंडसुख घेतले खरे पण त्यांच्या भाषणात तालुक्याच्या केलेल्या सर्वांगीण विकासाबाबत ठोसपणा दिसून आला नसल्याचे एकप्रकारे त्यांनीही मी केलेल्या विकासाबाबत कोणताही संकोच नाही असे मला वाटते किंबहुना असाच त्याचा अर्थ होतो असे महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांनी सांगितले. त्याच ठिकाणी गुरुवारी अजित पवार यांची प्रचारसभा होत आहे. त्यामुळे राजकीय युध्दात पुढचा आठवडा आणखी रंजक ठरेल यात शंका नाही.