मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कविवर्य ना. धो. महानोर पुरस्कार सोहळा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झाला. या सोहळयात बोलतांना शरद पवार म्हणाले की, आजचा हा सोहळा एका अतिशय छोटेखानी पण मनाला मनापासूनचा आनंद देणारा हा असा होता. यशवंतराव चव्हाण स्वतः एक उत्कृष्ट साहित्यिक होते. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली. हा त्यांचा एक महत्त्वाचा भाग होता. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य लोकांच्या जीवनामध्ये कसा दिसेल याच्यासाठी अखंड प्रयत्न करणारे, विचार करणारे एक प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक संबंध देशामध्ये होता. कलेबद्दल, साहित्यासंबंधी त्यांना अतीव आस्था होती. या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना धरून ठेवावं, त्यांच्याशी सुसंवाद ठेवावा याबद्दल त्यांना अतिशय आस्था होती. अनेक लोक त्याच्यामध्ये होते त्या मालिकेमध्ये ना धो. महानोरांचा उल्लेख प्रकर्षाने करावा. नाधो हे कोणत्या दर्जाचे कवी होते हे मी सांगायची गरज नाही. मराठीचं वाचन ज्यांच आहे, काव्याच्या संबंधीचा अभ्यास ज्यांचा आहे, उत्कृष्ट मराठी चित्रपट ज्यांनी पाहिले या सगळ्यांमध्ये ना.धो महानोर हे प्रकर्षानं आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. म्हणून त्यांच आणि चव्हाण साहेबांचं जे नातं होतं हे एक आगळं वेगळं असं नातं होतं. चव्हाण साहेब गेल्यानंतर आम्ही लोकांनी सगळ्यांनी चव्हाण साहेबांचे स्मारक त्या ठिकाणी करण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये काही लोक संस्थेमध्ये असलेच पाहिजेत अशी भूमिका घेतली. त्याच्यामध्ये ना.धो. महानोर यांचं नाव आहे. ते या जगाचा निरोप घेईपर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटरची जी कार्यकारणी आहे, विश्वस्त आहे या सगळ्यांमध्ये ते होते. त्यांचा एक ऋणानुबंध या सगळ्या गोष्टींच्या संबंधी होता.
यावेळी पवार म्हणाले की, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण हे या साहित्यासंबंधी अतिशय आस्था असणारे असे राजकारणी होते. सहजच ते बोलून जायचे आणि ते बोलून झाल्यानंतर काहीतरी वेगळ चित्र आपल्या सगळ्यांच्या मनासमोर उभ राहायचं. मला आठवतंय पुणे जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यात त्याच्या सीमेवर एक धरण बांधलं. त्या धरणाचे नाव उजनी. उजनी हे दुष्काळी भागाला अतिशय वरदान ठरणारी अशी ही योजना आहे. उजनी आणि उजनीच्या खालची जी नदी आहे ती नदी आज आपण चंद्रभागा म्हणतो. जी पंढरपूरला पोहोचते. ती नदी जी पंढरपूरला जाते. ती नदी उजनीने अडवली आणि चव्हाण साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की पांडुरंगा तुझी ही चंद्रभागा आम्ही या ठिकाणी अडवली, तुझं दर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, उन्हातानाचा दगड धोंड्याचा विचार न करता हा तुझा भक्त त्या ठिकाणी येतो. तो अस्वस्थ होईल त्याची चंद्रभागा आम्ही या ठिकाणी अडवल्यामुळे पण तू काही चिंता करू नकोस. तुझ्या दर्शनाला येईल पद दर्शन आगळं वेगळे असेल. चंद्रभागेच्या पाण्यातून तो शेती करेल त्याचा ज्वारीचं कणीस जे बाहेर येईल त्या कणसाचा प्रत्येक दाणा त्या वारकऱ्याला ,त्या शेतकऱ्याला तुझं दर्शन देईल. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील.
अनेकवेळा त्यांचा औरंगाबादला दौरा असल्यानंतर मी कटाक्षाने जायचा प्रयत्न करायचो. त्याचं कारण मराठवाड्याची नवी पिढी, वेगवेगळ्या कुटुंबातली ही साहित्याच्या संबंधी जी आस्था आहे त्यांचा आणि चव्हाण साहेबांचा सुसंवाद व्हावा, अशा प्रकारची त्यांची इच्छा असायची. ती जुळवाजवळ आम्ही करत असू. आणि ते तासन् तास बसायचे. दिवसभराचे कार्यक्रम संपले की सुभेदारी नावाचं तिथे गेस्ट हाऊस आहे. संध्याकाळी तिथे गेस्ट हाऊस मध्ये महानोर, चव्हाण साहेबांबरोबर आम्ही सर्व लोक आणि ही सगळी तरुण कवी , साहित्यिक आम्ही एकत्र त्या ठिकाणी बसलेलो असायचो आणि चव्हाण साहेब सगळ्यांना प्रोत्साहित करायचे. मला आठवतंय बंजारा समाजाचा एक तरुण कवी साहित्यिक आणि शिक्षक त्या बैठकीत होता. कविता मला आठवत नाही पण त्या कवितेचा अर्थ असा, की आमच्या हाताला संधी द्या त्या दगडावरती आम्ही शंकराची मूर्ती कोरली. त्यासाठी आम्ही मेहनत केली त्या आमच्या मेहनतीतून त्या दगडातून तुमचा शंकर उभा राहिला. तुम्ही सन्मानाने त्याला मंदिरात नेऊन ठेवलं, तुम्ही त्याची पूजा-अर्चा करता. आज आम्हाला अनेक वर्ष उपेक्षित राहून त्या मंदिराचा प्रवेश बंद करता? आता तुम्ही सांगा की तुमच्या शंकराचा बाप आम्ही आहोत की आणखी कोणी आहे? सांगायचा तात्पर्य हा की अशा सगळ्यांना प्रोत्साहित करणं, त्यांचा सन्मान करणं हे काम कटाक्षाने चव्हाण साहेबांकडून होत असे. त्यामध्ये फार मोठी भर ही महानोर यांनी दिली आहे.
उरळी कांचनला काही शेतकरी अतिशय उत्तम त्यांना साहित्य बद्दलची आस्था असायची. साहित्य संबंधीची आस्था असलेले लोक त्या ठिकाणी अनेक मान्यवर जात असत. पु.ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, ग.दि. मा. ही सगळी मंडळी जात असताना चव्हाणसाहेब कटाक्षाने महानोर यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलावून घेत असत. जो आयुष्यभर शेतीसाठी संपत्तीसाठी जो लढला आणि जगला त्याचा मनापासून त्याला समाधान मिळालं आणि तेच खरे समाधान मानण्यासाठी त्यांनी आयुष्याच्या दृष्टीपाठ ठेवला. आणि त्याच्या पायथ्याशी पळसखेड परिसरामध्ये एक उच्च दर्जाचा साहित्यिक हा जन्माला आला तो बळीराजाची सेवा करण्याच्या साठी आणि त्या बळीराजापासून प्रेरणा घेऊन उत्तम प्रकारचे साहित्य निर्माण करण्यासाठी लोकप्रिय झालेला होता. म्हणून चव्हाण सेंटरचा कार्यक्रम आज या ठिकाणी असल्यानंतर चव्हाण सेंटर मध्ये चव्हाण साहेबांना ज्या व्यक्तींच्या संदर्भातील प्रचंड आस्था होती अशांपैकी ना.धो. महानोर हे अतिशय महत्त्वाचे घटक होते. त्यांचे आणि चव्हाण साहेब यांचे ऋणानुबंध होते नंतरच्या काळामध्ये पुढच्या पिढीमध्ये सातत्य टिकवायचं असेल तर दोघांमध्ये या प्रकारचे उपक्रम आज या ठिकाणी सुरू करावा ही भूमिका आज स्वीकारली. मला आनंद आहे की, महाराष्ट्राच्या सहा महसूल विभागातून शेतकरी आणि साहित्यिक यांना जोडून त्यांना सन्मानित करावं, असा उपक्रम हातामध्ये घेतला. त्याचा पहिला सोहळा आज या ठिकाणी होतोय याचा मला मनापासून आनंद आहे. ज्यांचा सन्मान त्या प्रत्येक व्यक्तीचे मी अंतकरणापासून अभिनंदन करतो असे सांगत पवार यांनी आपल्या भाषणांचा समारोप केला.