नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंंगाबादकर यांचे आज निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पंचवटी फार्मसी कॉलेजचे ते प्राचार्य होते. सावानाचे अध्यक्षपद त्यांनी १० वर्षे भूषविले. त्यांच्या नेतृत्वात सावानाने अनेक कार्यक्रम राबविले. ग्रंथालय भूषण मुरलीधर औरंगाबादकर यांचे ते चिरंजीव होते. सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचा मोठा नावलौकिक होता.
ग्रंथभूषण स्व. मु. शं. औरंगाबादकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेले विलास औरंगाबादकर यांची सन 2007 मध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळामध्ये निवड करण्यात आली. सन 2008 ते 2010 या काळात ते वाचनालयाचे कार्याध्यक्ष होते. सन 2012 पासून त्यांनी वाचनालयाचे अध्यक्षपद भूषविले. महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेच्या फार्मसी आणि केटरिंग कॉलेजचे प्राचार्यपद त्यांनी भूषविले आणि ही दोन्हीही महाविद्यालये नावारूपास आणली. नाशिकच्या चिन्मय मिशन या संस्थेचेही ते अध्यक्ष होते. प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या पश्चात एक भाऊ, बहीण, पत्नी, 2 मुले, सून, नातू असा परिवार आहे. आज दुपारी 3 वाजता सावानाच्या प. सा. नाट्यगृहाच्या आवारात प्रा. औरंगाबादकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. त्यानंतर नाशिकच्या अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.