सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकाच जिल्ह्यात भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांमधील शत्रुत्व सर्वांना माहिती होते, परंतु आता एकाने दुसऱ्याच्या कामावर बुलडोजर फिरवल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात भाजपची फिरकी घेतली जात आहे.
साताऱ्यामध्ये राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद फार जुना आहे. दोघांचे एकमेकांसोबत पटत नाही, हेही सर्वांना माहिती आहे. विशेष म्हणजे पक्षातील श्रेष्ठींनाही याची जाणीव आहे. मात्र आता हा वाद चव्हाट्यावर आला असून एका घटनेमुळे सर्वदूर त्याची चर्चा होत आहे. साताऱ्यातील खिंडवाडीमध्ये शिवेंद्रराजेंनी बाजार समितीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी एक छोटेसे कार्यालय देखील उभारण्यात आले होते. पण कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी उदयनराजे भोसले तिथे पोहोचले. त्यांच्यासोबत एक बुलडोजर आणि डझनभर कार्यकर्ते होते.
राजेंच्या सूचनांनुसार भूमिपूजनासाठी उभारण्यात आलेल्या कार्यालयावर बुलडोजर फिरवण्यात आला. संपूर्ण कार्यालय नेस्तनाबूत करण्यात आले. यावेळी शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते तिथे पोहोचले व विरोध करू लागले. परंतु, उदयनराजे स्वतः उभे राहून सूचना देत असल्याने कुणालाही रोखण्याची हिंमत झाली नाही. त्यावेळी उदयनराजे फोनवर पूर्णवेळ कुणासोबत तर बोलत होते. या प्रकाराची माहिती शिवेंद्रराजेंना देण्यात आली. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याऐवजी नासधूस करणे उदयनराजेंना शोभणारे नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
श्रेष्ठींकडे रिपोर्टींग
साताऱ्यातील या प्रकाराचे व्हिडियो व्हायरल होत असून याची संपूर्ण माहिती श्रेष्ठींकडे पाठविण्यात आली आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल उदयनराजेंवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे भाजपचे राज्यातील नेते कुठलाही निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उदयनराजेंना हवे काय?
कोणत्या उद्देशाने उदयनराजे यांनी हा उपद्व्याप केला, याबद्दल त्यांनी अद्याप स्पष्टोक्ती दिलेली नाही. शिवेंद्रराजेंसोबत शत्रुत्व असले तरीही कार्यक्रम उधळून लावण्यामागचे कारण काय आहे, हे त्यांनी सांगितलेले नाही, हे विशेष.