मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल करुन राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले.
दिनांक १५ मार्च रोजी ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा मोरणा परिसरात अपघात झाला होता. अपघातावेळी त्यांची स्थानिकांशी बाचाबाची झाली होती. त्यानंतरही दोन – तीन दिवसांनी स्थानिक ग्रामस्थ व कदम यांच्यात वादावादी झाली होती. याचा राग मनात धरुन रविवारी रात्री ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने मोरणा भागात बेछुट गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिक व्यक्तींचा मुत्यू झाला.
तसेच तेथील एका सोसायटीची निवडणूक व पवनचक्कीचे प्रलंबित पेमेंट हा विषयसुध्दा या गोळीबाराच्या पाठीमागे आहे. या घटनेत मृत व्यक्तींमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांचा कार्यकर्ता आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात स्थानिकांच्यामध्ये दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणात मदन कदम व त्यांच्या दोन मुलांना अटक केली असली तरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.
https://www.facebook.com/watch/?v=1665914480536180
Satara Firing Ex Corporator Assembly Session