सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहरी निसर्गासह विविध समस्यांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्याला कधी कधी अत्यंत दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्याच्या समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहेत. आता एक असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील कौतिकपाडे येथे अज्ञात व्यक्तीने एका शेतकऱ्याच्या शेतातील पपईची तब्बल २०० झाडे तोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे हा शेतकरी पार कोलमडून पडला आहे.
अशा पद्धतीने झाडे तोडण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. येथील शेतकरी दगा पवार यांनी आपल्या शेतात लाखो रुपये खर्च करुन पपईची २०० पेक्षा जास्त झाडांची लागवड केली. ही झाडे त्यांनी पोटच्या पोराप्रमाणे जपली. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत कांदा चोरी किंवा ज्या पिकाला भाव आहे ती चोरीला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, झाडे तोडण्याचा धक्कादायक हा प्रकार घडला आहे.
परिचितानेच हा प्रकार केला की अन्य कुणी व्यक्तीने याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. ज्याने हा प्रकार केला त्यातून त्याला काय मिळाले, असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. मात्र, पवार या शेतकऱ्यावर मोठे संकटच कोसळले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हळहळ व्यक्त होण्यासह तीव्र संतापही व्यक्त होत आहे. तसेच, अशा व्यक्तींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे.
Satana Crime Farmer 200 papaya tree cut in farm